ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत
By Admin | Updated: November 16, 2014 00:10 IST2014-11-16T00:10:15+5:302014-11-16T00:10:15+5:30
वाहनधारकांचे हाल : सांगलीतील वाहतुकीच्या गैरनियोजनाचा नागरिकांना फटका

ड्रेनेजच्या कामामुळे वाहतूक विस्कळीत
सांगली : कॉलेज कॉर्नरवर गेल्या पंधरा दिवसांपासून ड्रेनेज दुरुस्तीचे काम महापालिकेकडून सुरू आहे. या चौकातील मुख्य रस्ताच आज (शनिवारी) ड्रेनेजच्या पाईपलाईनसाठी खोदण्यात आला. रस्ता खोदताना वाहतूक अन्य मार्गाने वळविण्याबाबतचे कोणतेही नियोजन याठिकाणी न केल्याने दिवसभर चारही मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. वाहतुकीच्या या गैरनियोजनाचा फटका वाहनधारक व नागरिकांना बसला.
सकाळी दहा वाजता याठिकाणी रस्ता खुदाईचे काम हाती घेण्यात आले. रस्त्यावरच पाईप टाकून वाहतूक बंद करण्यात आली. चारही बाजूने येणारी वाहने याठिकाणी येऊन परत पर्यायी मार्गाच्या शोधात फिरत होती. सांगली-माधवनगर मार्गावरील वाहने दुर्गामाता मंदिरामागील कच्च्या रस्त्यांवरून ये-जा करीत होती. दुसरीकडे टिंबर एरियाकडून सांगलीकडे जाणारी व सांगलीतून टिंबर एरियाकडे जाणारी वाहने अन्य पर्यायी मार्गाने जात होती. वास्तविक हा रस्ता बंद करतेवेळी माधवनगर रोडवर दुर्गामाता मंदिराजवळ तसेच वखारभाग आणि अन्य दोन रस्त्यांवर जिथून वाहतूक वळवायची होती, त्याठिकाणी बॅरिकेटस् लावण्याची गरज होती. असे बॅरिकेटस् न लावल्यामुळे ड्रनेजचे काम जिथे सुरू आहे तिथेपर्यंत वाहने येऊन परत फिरत होती. त्यामुळे वाहतुकीचा एकच गोंधळ उडाला होता.
दुर्गामाता मंदिराच्या पिछाडीचा रस्ता अत्यंत अरुंद असल्याने यठिकाणी दिवसभर वाहनांची दाटी होती. गेल्या पंधरा दिवसांपासून याठिकाणी ड्रेनेजचे काम सुरू आहे. मंदगतीने काम सुरू असल्यामुळे चौकात वाहतुकीची वारंवार कोंडी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून वाहनधारकांचे प्रचंड हाल होत आहेत. पादचाऱ्यांनाही ये-जा करणे मुश्किल होत आहे.
वाहतुकीच्या गैरनियोजनामुळे या फटका बसत होता. दिवसभर याठिकाणी अतिरिक्त वाहतूक पोलीस ठेवून नियोजन करण्याची गरज होती. असे कोणतेही नियोजन झाले नाही. रविवारीही याठिकाणी काम सुरू राहणार असल्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पुन्हा वाहतुकीचा बोजवारा उडण्याची शक्यता आहे.
पावसामुळे हाल
सांगलीत शनिवारी दुपारपासून पावसास सुरुवात झाल्याने दुर्गामाता मंदिराच्या मागून जाणाऱ्या रस्त्यावर प्रचंड दलदल निर्माण झाली. तसेच ज्याठिकाणी काम सुरू होते त्याठिकाणीही मोठ्या प्रमाणावर खुदाईमुळे चिखल निर्माण झाला होता. वाहनधारक व नागरिकांचे या दलदलीमुळेही हाल झाले.