वाहतूक क्रेन राजकारणाच्या भोवऱ्यात
By Admin | Updated: September 26, 2015 00:16 IST2015-09-25T23:45:14+5:302015-09-26T00:16:17+5:30
इस्लामपुरात वाहतुकीची कोंडी कायम : राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे क्रेन बंद

वाहतूक क्रेन राजकारणाच्या भोवऱ्यात
अशोक पाटील-इस्लामपूर नगरपरिषद आणि वाहतूक पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील वाहतूक कोंडीवर नियंत्रण ठेवण्यासाठी भाडेतत्त्वावर खासगी क्रेन घेण्यात आली होती. परंतु राष्ट्रवादीतील वादामुळे सध्या ती बंद आहे. त्यामुळे वाहतुकीची कोंडी पुन्हा वाढू लागली आहे. दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर अस्ताव्यस्तपणे उभी करुन खरेदीसाठी जात असल्यानेही वाहतूक विस्कळीत होत आहे.
शहरातील एकेरी मार्गाचा बोजवारा यापूर्वीच उडाला आहे. बेजबाबदारपणे दुचाकी, चारचाकी वाहने रस्त्यावर लावणाऱ्या वाहनधारकांना लगाम बसण्यासाठी वाहतूक पोलीस कक्ष आणि नगरपरिषदेच्यावतीने नगरसेवक पीरअली पुणेकर यांची क्रेन भाडेतत्त्वावर घेण्यात आली होती. या भाड्यापोटी क्रेन मालक कामगारांचा पगार अदा करत होते. परंतु या क्रेन मालकास पालिकेने भाडे न दिल्यामुळे त्याने ही क्रेनच बंद केली. त्यामुळे वाहतुकीचा बोजवारा पुन्हा एकदा उडाला. त्यानंतर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते गोपाल नागे यांनी नागरिकांच्या सोयीसाठी ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर नगरपालिकेस क्रेन उपलब्ध करुन दिली. पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेच्यावतीने शहरातील वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी या क्रेनच्या माध्यमातून नियमितपणे काम सुरू होते. मात्र कारवाईमधून राष्ट्रवादीचे शहर उपाध्यक्ष मानसिंग पाटील यांची नो पार्किंगमध्ये लावलेली दुचाकी क्रेनवर काम करणाऱ्या मुलांनी उचलून पोलीस ठाण्यात आणली. त्यामुळे मानसिंग पाटील यांनी ‘ही गाडी न्यायालयातूनच सोडवेन’, असा पवित्रा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीतील कार्यकर्त्यांत अंतर्गत संघर्ष उफाळून आला. यातूनच ही क्रेन बंद करण्यात आली.
पालिका निवडणुकीत प्रभाग क्र. ३ मधून राष्ट्रवादीतर्फे मानसिंग पाटील, सुभाष सूर्यवंशी, सीमा इदाते, छाया देसाई यांनी निवडणूक लढवली होती. मानसिंग पाटील वगळता इतर सर्व उमेदवार विजयी झाले. पाटील यांच्या पराभवाला राष्ट्रवादीचेच कार्यकर्ते कारणीभूत असल्याचा राग त्यांच्या मनात आजही आहे. त्यामुळेच पाटील यांनी क्रेनला विरोध केल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादीतील या अंतर्गत कुरघोड्यांमुळे वाहतुकीला शिस्त लावणारी क्रेन बंद पडली आहे.
हिरवा कंदील नाही
गोपाल नागे राष्ट्रवादीचे परिसरातील सक्रिय कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. त्यांनाही पालिकेच्या रणांगणात उतरण्याची इच्छा आहे. परंतु नगराध्यक्ष सुभाष सूर्यवंशी हेही त्यांच्याच समाजातील आहेत. तथापि आगामी पालिका निवडणुकीत ते निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्यांची क्रेन बंद झाल्यानंतर नगरसेवक पीरअली पुणेकर यांनी त्यांची क्रेन उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला होता. क्रेन दुरुस्तीसाठी ३0 ते ४0 हजार रुपयांचा खर्चही त्यांनी केला. परंतु पालिकेतील राजकीय कुरघोड्यांमुळे त्यांची क्रेन वापरण्यास पालिका प्रशासनाने अजूनही हिरवा कंदील दाखविलेला नाही.
पूर्वी क्रेन सुरू होती, त्यावेळी पालिकेचे आर्थिक नुकसान झाले. नंतर ना नफा ना तोटा तत्त्वावर दुसरी क्रेन सुरू होती. मात्र राष्ट्रवादीतील अंतर्गत वादामुळे ती पुन्हा बंद आहे. याचा परिणाम शहरातील वाहतूक कोंडीवर होत आहे.
- विजय कुंभार, विरोधी पक्षनेते