भाताचे पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2021 04:20 IST2021-06-25T04:20:19+5:302021-06-25T04:20:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : शिराळा तालुका म्हणजे भात पिकाचे व विविध भातांच्या वाणांचे कोठार म्हणून ओळखले जाते. ...

भाताचे पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : शिराळा तालुका म्हणजे भात पिकाचे व विविध भातांच्या वाणांचे कोठार म्हणून ओळखले जाते. दरवर्षी या भागातील शेतकरी धूळवाफ पध्दतीने भात पेरणी करतात. एकीकडे भातक्षेत्र कमी होत आहे, तर दुसरीकडे शरीरास पोषक वाण हळूहळू पडद्यामागे जात आहेत. पारंपरिक भाताचे बियाणे काळाच्या पडद्याआड जाण्याच्या मार्गावर आहेत.
सध्या शेतकरी सुधारित जातीच्या हायब्रीड बियाणांना पसंती देत असून देशी वाण नाहीसे होताना दिसत आहेत. या भागातील वरंगाल, दोडग, मोडग, टायचन, वांडरं, जोंधळा, शिराळी, रत्नागिरी २४ अशा अनेक शरीरास पोषक असलेल्या वाणांच्या भातपिकाचे उत्पादन घेतले जात होते; परंतु सध्या सुधारित व संकरित वाण उपलब्ध झाल्यामुळे शेतकऱ्यांचा ओढा संकरित बियाणांकडे आहे. यातून जादा उत्पादन घेत आहेत. त्यामुळे पारंपरिक वाण नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
बळीराजाला भातपिकासाठी खूप कष्ट उपसावे लागते. शिवाय उत्पादन खर्चापेक्षा नफा कमी, मजुरांची कमतरता या साऱ्यामुळे वर्षाकाठी पुरेल एवढेच सुधारित व संकरित भातपिकाचे उत्पन्न घेऊन, उसाचे उत्पन्न मोठ्या प्रमाणावर घेतले जात आहे. उसामध्ये सूर्यफूल, मका, भुईमूग, सोयाबीन आदी आंतरपिकेही घेतली जात आहेत. यामुळे कमी कष्टात दुहेरी फायदा मिळत आहे.
चाैकट
उसाला महत्त्व वाढले
ऊस पिकासाठी लागणारे मुबलक पाणी बारमाही वाहणाऱ्या वारणा नदीमुळे कधीही कमी पडत नाही. याशिवाय कालव्यातील पाणी सायफनद्वारे शेतीला देता येत असल्याने काही शेतकऱ्यांना विद्युत पंपाची आवश्यकताही भासत नाही. यामुळे आपोआपच भरमसाट प्रमाणावर येणाऱ्या विद्युत बिलाचा खर्चही वाचत आहे. सर्वात महत्त्वाची बाजू म्हणजे तालुक्यात सक्षमपणे सुरू असणारे दोन साखर कारखाने व सहकारी सेवा सोसायटींचे व बँकांचे आर्थिक साहाय्य यामुळे शेतकरी ऊस उत्पादन घेताना दिसून येत आहे.