पारंपरिक अंतर्गत कुरघोड्यांचे संकेत

By Admin | Updated: November 11, 2016 23:08 IST2016-11-11T23:08:18+5:302016-11-11T23:08:18+5:30

इस्लामपूर पालिका निवडणूक : सत्ता मिळविण्यासाठी वेगवेगळे फंडे

Traditional internal touch signal | पारंपरिक अंतर्गत कुरघोड्यांचे संकेत

पारंपरिक अंतर्गत कुरघोड्यांचे संकेत

अशोक पाटील ल्ल इस्लामपूर
इस्लामपूर पालिकेत गेल्या ३0 वर्षात सत्ताधारी राष्ट्रवादीवर आमदार जयंत पाटील यांचा वरचष्मा राहिला आहे. परंतु या निवडणुकीत निशिकांत पाटील आणि शिवाजी पवार यांच्या निर्णयाने राष्ट्रवादीला जबर धक्का बसला आहे. याचा बदला घेण्यासाठी विरोधकांतील एक मोहरा टिपण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न होता. परंतु विरोधकांनी तो हाणून पाडला. त्यामुळेच राष्ट्रवादीतील पदाधिकारी, कार्यकर्ते सैराट झाले आहेत. काही प्रभागातून राष्ट्रवादीसह विकास आघाडीच्या नाराज मंडळींनी आपले अर्ज तसेच ठेवल्याने, तिरंगी लढती होणार आहेत. यामुळे अंतर्गत कुरघोड्यांना ऊत येणार आहे.
प्रभाग क्र. ७ मध्ये राष्ट्रवादीमधून संजय कोरे, जयश्री माळी हे पारंपरिक लढतीतील जुनेच उमेदवार आहेत, तर विकास आघाडीतून चेतन शिंदे, रुक्साना इबुशे त्यांना लढत देणार आहेत. गत निवडणुकीत संजय कोरे यांच्यावर केलेल्या कुरघोड्यांची चर्चा आता पुन्हा रुंगू लागली आहे. यावेळीही राष्ट्रवादीतीलच काही नेते संजय कोरे यांची राजकीय गेम करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी पालिकेतील काही ठेकेदारांची बैठक घेतल्याची चर्चा आहे.
प्रभाग ८ मध्ये माजी मंत्री अण्णासाहेब डांगे यांचे चिरंजीव विश्वास डांगे आणि नगरसेवक पीरअल्ली पुणेकर यांच्या पत्नी जरीना पुणेकर या उमेदवार आहेत, तर विकास आघाडीतून येथे जलाल मुल्ला आणि रुपाली साळुंखे लढत देत आहेत. या प्रभागात २ हजारहून अधिक मतदार मुस्लिम समाजाचे आहेत. त्यामुळे मुस्लिम मतदारांचा कल आपल्याकडे वळविण्यासाठी एकमेकांवर कुरघोड्या होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा प्रभाग डांगे यांच्या अस्तित्वाचा बनला आहे.
प्रभाग क्र. ९ मध्ये प्रारंभापासूनच कुरघोड्यांचे राजकारण पेटले आहे. हा प्रभाग राष्ट्रवादीच्या विरोधात असल्याचे मानले जात होते. परंतु वैभव पवार यांच्या उमेदवारीने पहिल्यापासूनच इच्छुक असलेले एल. एन. शहा यांना पक्षाच्या तिकिटापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांनी आपली अपक्ष उमेदवारी देऊन नाराजी व्यक्त केली आहे. अर्ज मागे घ्यायला ५ मिनिटांचा अवधी असताना शहा यांनी माघार घेतली.
तसेच राष्ट्रवादीने गेल्या तीन निवडणुकांपासून टोलवत ठेवलेल्या सुरेश हावलदार यांनीही यावेळी कोणाचेही न ऐकता अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे नेमकी कोण कोणाची राजकीय गेम करणार, याकडे लक्ष लागून राहिले आहे.
प्रभाग क्र. ११ मध्ये सर्व पाटील भाऊपणातील राजकारण चांगलेच पेटले आहे. या प्रभागात राष्ट्रवादीतून चंद्रकांत पाटील आणि मानाजी पाटील वाड्यातील सौ. मनीषा पाटील या उमेदवार आहेत. त्यांच्याविरोधात विकास आघाडीतून मानाजी पाटील वाड्यातीलच अजित पाटील आणि जाधव भाऊपणातील रेखा जाधव यांच्यात सरळ लढत होत आहे.
या प्रभागात पाटील भाऊपणातील विकास आघाडीचे नाराज उमेदवार दादासाहेब पाटील आणि राष्ट्रवादीचे भास्कर (आबा) मोरे यांनी आपले अपक्ष अर्ज ठेवले आहेत. त्यामुळे या प्रभागात मोठ्या प्रमाणात मतांची विभागणी होणार आहे. नेहमीच उमेदवारीसाठी आग्रह धरणाऱ्या संजय पाटील यांनी यावेळी मात्र अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. परंतु अंतिमक्षणी आमदार जयंत पाटील यांचा शब्द प्रमाण मानून संजय पाटील यांनी आपली तलवार म्यान केली.
प्रभाग क्र. १३ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो. या प्रभागात राष्ट्रवादीतून उमेदवारी मिळविताना माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे यांना मोठे प्रयत्न करावे लागले. याच प्रभागात माजी नगरसेवक अशोकतात्या पाटील यांचे चिरंजीव राजवर्धन पाटील यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला होता.
त्यांनीही अंतिम टप्प्यात आपला अर्ज मागे घेतला असला तरी, त्यांची भूमिका काय राहणार, यावरही बरेच काही अवलंबून राहणार आहे. याचा फायदा विकास आघाडीचे विजय कुंभार यांना कितपत उठवता येतो, हे येणारा काळच ठरवणार आहे.
बहुतांश प्रभागात दुरंगी लढती होत आहेत, तर काही प्रभागात राष्ट्रवादी आणि विकास आघाडीतील नाराज उमेदवारांमुळे तिरंगी, चौरंगी लढती होणार आहेत. त्यामुळे पारंपरिक अंतर्गत कुरघोड्यांना उधाण येणार आहे.
उमेदवार : अज्ञातवासात
प्रभाग क्र. ३ मधील राष्ट्रवादीचे अपक्ष उमेदवार राहुल नागे यांच्यावर अर्ज मागे घेण्यासाठी दबाव वाढू लागल्याने त्यांनी अज्ञातवासात राहणेच पसंत केले आहे. ते सध्या तिरुपती बालाजी येथे वास्तव्यास असल्याची चर्चा आहे. त्यांचे मतपरिवर्तन करण्यात राष्ट्रवादीचे नेते यशस्वी होणार का? याचीच चर्चा सुरु आहे. दरम्यान पालिकेच्या सभागृहात जाण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांतील उमेदवार उतावळे झाले आहेत. त्यामुळे दिवसा एकत्रित फिरणाऱ्या उमेदवारांनी रात्रीच्यावेळी मात्र, मला मत द्या, बाकीचं तुमचं तुम्ही पाहा, असा प्रचाराचा नवीन फंडा काढला आहे. त्यामुळे मतांचा भाव चांगलाच वधारणार आहे.


 

Web Title: Traditional internal touch signal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.