भाजी मंडईतील व्यापाऱ्यांची पालिकेत धडक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:19 IST2021-06-03T04:19:45+5:302021-06-03T04:19:45+5:30
इस्लामपूर : शहरातील रस्त्यांवरील भाजी विक्री पूर्ण बंद करावी. या व्यापाऱ्यांना अधिकृत भाजी मंडईत विक्री करण्यासाठी बसवावे. मंडईतील कचरा ...

भाजी मंडईतील व्यापाऱ्यांची पालिकेत धडक
इस्लामपूर : शहरातील रस्त्यांवरील भाजी विक्री पूर्ण बंद करावी. या व्यापाऱ्यांना अधिकृत भाजी मंडईत विक्री करण्यासाठी बसवावे. मंडईतील कचरा काढून मंडई पूर्ण पाण्याने स्वच्छ करून औषध फवारणी करावी. तेथील लोकांचे अन्य ठिकाणी वास्तव्य करावे, या मागण्यांसाठी बुधवारी भाजीपाला व्यापाऱ्यांनी पालिकेत धडक मारली. मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन दिले.
यावेळी आचार्य जावडेकर भाजी मंडई संघटनेचे व्यापारी आणि सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी हे निवेदन दिले. त्यामध्ये म्हटले आहे की, शहरात जिल्हा प्रशासनाचे आदेश डावलून रस्त्यांवर काही व्यापारी भाजीपाला विक्री करत आहेत. अधिकृत भाजी मंडईत अत्यल्प प्रमाणात भाजीपाला विक्री होत आहे. तसेच लाॅकडाऊनच्या काळात अधिकृत भाजी मंडई बंद असल्याने काही लोक त्या भाजी मंडईत वास्तव्य करून राहिले आहेत. भाजी मंडईत कचऱ्याचे ढीग असून घाणीचे साम्राज्य झाले आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. त्याचा त्रास भाजी विक्रेते व नागरिकांना सहन करावा लागत आहे.
याबाबत त्वरित निर्णय होऊन कारवाई करावी, अन्यथा भाजी मंडई संघटना व नागरिकांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असे सामाजिक कार्यकर्ते गजानन पाटील यांनी सांगितले. यावेळी शंकर माळी, विकास भोसले, हिना खलिफा, सुनीता पाटील, पप्पू पाटील, हामिद तांबोळी, आबा टिबे, बाळ माळी, सविता वायदंडे उपस्थित होते.
फोटो-
इस्लामपूर येथील भाजी व्यापाऱ्यांनी मुख्याधिकारी अरविंद माळी यांना निवेदन दिले. यावेळी गजानन पाटील, शंकर माळी, विकास भोसले, हिना खलिफा, सुनीता पाटील उपस्थित होत्या.