प्रशासनाच्या छुप्या लॉकडाऊनला तासगावमध्ये व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:28 IST2021-04-09T04:28:34+5:302021-04-09T04:28:34+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तासगाव : राज्य शासनाकडून शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार ...

Traders in Tasgaon oppose the administration's covert lockdown | प्रशासनाच्या छुप्या लॉकडाऊनला तासगावमध्ये व्यापाऱ्यांचा विरोध

प्रशासनाच्या छुप्या लॉकडाऊनला तासगावमध्ये व्यापाऱ्यांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

तासगाव : राज्य शासनाकडून शनिवार-रविवारी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली. मात्र, प्रशासनाकडून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यापार ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. या छुप्या लॉकडाऊनला व्यापारी वर्गातून तीव्र विरोध होत असून, प्रशासनाकडून मात्र नियमांची अंमलबजावणी सुरू आहे. तासगाव शहरासह तालुक्यात बहुतांश ठिकाणी बंदमुळे गर्दी ओसरल्याचे चित्र आहे.

मंगळवारी सकाळपासूनच व्यापार बंद ठेवावा लागला. ‘ब्रेक द चेन’च्या नावाखाली पुन्हा ३० एप्रिलपर्यंत लॉकडाऊन पाळावा लागणार आहे, हे समजताच व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. त्यातच अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली अर्ध्या गावातील व्यवहार सुरू होता. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली. तासगाव पोलीस निरीक्षक संजीव झाडे आणि मुख्याधिकारी पृथ्वीराज पाटील यांनी संयमाने परिस्थिती हाताळली. व्यापाऱ्यांच्या शंकांचे निरसन केले.

खासदार संजयकाका पाटील यांनी व्यापाऱ्यांना शासनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलीस निरीक्षक झाडे व मुख्याधिकारी पाटील आपल्या सहकाऱ्यांसह रस्त्यावर उतरले. अत्यावश्यक सेवा सोडून इतर दुकाने बंद करण्याचे आवाहन त्यांनी केले. मुख्याधिकारी पाटील हातात शासनाच्या नियमांचा कागद घेऊन व्यापाऱ्यांना समजावून सांगत होते. यावर व्यापाऱ्यांनी शनिवार, रविवारी आम्ही बंद ठेवणार होतो, आता आमची दुकाने का बंद करताय, असा प्रश्न उपस्थित केला. तीस तारखेपर्यंत दुकान बंद ठेवायला लागणार असल्यामुळे व्यापाऱ्यांचा संताप उफाळून आला. संतप्त व्यापाऱ्यांनी तासगाव पालिकेत धाव घेतली.

प्रशासनाने शासनाच्या नियमांनुसार अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचे सांगून अत्यावश्यक सेवा वगळून बाकीचा व्यापार बंद ठेवण्यासाठी प्रयत्न केले. रस्त्यावर दिसणारी गर्दी ओसरली असून, अनेक व्यापारपेठ आतून शुकशुकाट असल्याचे चित्र आहे.

कोट

शेतकऱ्यांसह व्यापारीही आर्थिक अडचणीत आहेत. बंदचा निर्णय व्यापाऱ्यांना परवडणारा नाही. कोरोनाबाबतचे प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणून आवश्यक त्या उपाययोजना करून व्यापार सुरू ठेवायला हवा. व्यापार सुरू ठेवताना प्रशासनाकडून ठरावीक वेळा आणि ठरावीक दिवस ठरवून व्यापार सुरू ठेवल्यास अनावश्यक गर्दी होणार नाही. व्यवसाय सुरू ठेवायला हवा; अन्यथा व्यापारी, रोजगारी उद्‌ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाहीत.

-बाबूराव जाधव,

तालुकाध्यक्ष, ॲग्रो डीलर असोसिएशन, तासगाव.

Web Title: Traders in Tasgaon oppose the administration's covert lockdown