आयर्विनच्या पर्यायी पुलाला व्यापाऱ्यांचा विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:25 IST2021-03-24T04:25:02+5:302021-03-24T04:25:02+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाला व्यापाऱ्यांनी मंगळवारी विरोध केला. या नव्या पुलामुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, ...

Traders oppose Irwin's alternative bridge | आयर्विनच्या पर्यायी पुलाला व्यापाऱ्यांचा विरोध

आयर्विनच्या पर्यायी पुलाला व्यापाऱ्यांचा विरोध

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : शहरातील आयर्विनच्या पर्यायी पुलाला व्यापाऱ्यांनी मंगळवारी विरोध केला. या नव्या पुलामुळे बाजारपेठ उद्ध्वस्त होईल, अशी भीती व्यक्त करीत हा पुल रद्द करावा, अशी मागणीही व्यापाऱ्यांनी पालकमंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली.

यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी महापौर सुरेश पाटील, माजी नगरसेवक शेखर माने उपस्थित होते. गणपती पेठ, कापडपेठ, मेन रोड, हरभट रोडवरील व्यापाऱ्यांनी महापालिकेत जयंत पाटील यांची भेट घेऊन निवेदन दिले. यात म्हटले आहे की, आयर्विनच्या पर्यायी पुलाला स्थगिती दिल्याने दिलासा मिळाला होता; पण आता पुन्हा पुलाचे काम सुरू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्याबाबत समाजात गैरसमज पसरवले जात आहेत. हा पर्यायी पूल झाल्यास मुख्य बाजारपेठ ही खरेदी-विक्रीची जागा न राहता फक्त वाहतुकीचा रस्ता म्हणून अस्तित्वात येईल. सामान्य माणूस, ग्राहक खरेदीसाठी येऊ शकणार नाही. सर्वच शहरांमध्ये रिंगरोड विकसित होत आहे. शहराबाहेरील येणारी सर्व वाहने, वाहतूक यामुळे नियंत्रित होत असते; पण या पर्यायी पुलामुळे ही वाहतूक, वाहने थेट बाजारपेठेत प्रवेश करणार आहेत. त्यामुळे संपूर्ण बाजारपेठ तर संपवणार आहेतच, शिवाय वाहतुकीची व्यवस्थाही विस्कळीत होणार आहेत. त्यामुळे हा पर्यायी पूल रद्द करावा अथवा पूर्वीच्या मंजूर आराखड्यानुसार त्याचे काम व्हावे, अशी मागणीही त्यांनी केली.

शहरातील बाजारपेठेतील व्यापाऱ्यांच्या काही समस्या आहेत. त्यावर चर्चा करण्यासाठी संघटनांना वेळ द्यावा. हरभट रोड, कापडपेठ येथे पार्किंगची व्यवस्था नाही. त्यासाठी अद्ययावत पार्किंग व्यवस्थेबाबत आपल्या स्तरावर आदेश देण्यात यावेत. महापूर व कोरोनातून व्यापारी वर्ग अजून सावरलेला नाही. त्यामुळे स्थानिक प्रशासनाकडून दिलासादायक वागणुकीची गरज आहे. संघटनांशी चर्चा करून प्रशासनाने करवसुली करावी, यासाठी संबंधितांना सूचना द्यावात, अशी मागणीही संघटनांच्या वतीने करण्यात आली. यावेळी व्यापारी एकता असोसिएशन, कापडपेठ व्यापारी असोसिएशन, सराफ व्यापारी असोसिएशन, दत्त मारुती रोड व्यापारी असोसिएशन, गणपती पेठ व्यापारी असोसिएशनचे सदस्य उपस्थित होते.

Web Title: Traders oppose Irwin's alternative bridge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.