इस्लामपुरात व्यापाऱ्यांनी उघडली मागची दारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:24 IST2021-05-22T04:24:15+5:302021-05-22T04:24:15+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : शहरात कडक लॉकडाऊन असला तरी निर्बंध शिथिलतेचा गैरफायदा घेऊन दुकानांच्या मागील दाराने सर्व वस्तू ...

इस्लामपुरात व्यापाऱ्यांनी उघडली मागची दारे
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरात कडक लॉकडाऊन असला तरी निर्बंध शिथिलतेचा गैरफायदा घेऊन दुकानांच्या मागील दाराने सर्व वस्तू मिळत आहेत. त्यामुळे कोरोना संसर्ग वाढत चालला आहे. त्यामुळे उपचारासाठी व्यवस्था अपुरी पडत आहे.
इस्लामपुरातील गर्दी कमी करणे हे प्रशासनापुढे आव्हान आहे.
पालकमंत्री जयंत पाटील प्रत्येक आठवड्यात तहसील कार्यालयात आढावा बैठक घेतात. त्यात फक्त कागदावरच निर्णय घेतले जातात. त्यांची अंमलबजावणी होताना दिसत नाही. त्यामुळे सकाळी अकरापर्यंत रस्ते गर्दीने फुलून जातात. किरकोळ व्यापाऱ्यांना लॉकडाऊन कर्जाच्या खाईत लोटत आहे. काही व्यापारी अर्धवट शटर उघडून किंवा मागील दराने मालाची विक्री करत आहेत. यामुळे नागरिक खरेदीसाठी गर्दी करू लागले आहेत.
होलसेल व्यापारी किरकोळ व्यवसाय करत आहेत. त्यांच्या दुकानात ग्राहक गर्दी करत आहेत. तेथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. परिणामी संसर्ग वाढत आहे. रस्त्यावरील गर्दी आवरणे हे शासकीय यंत्रणेपुढे आव्हान आहे.
कोट
लॉकडाऊनमध्ये सात ते अकरापर्यंत थोडी शिथिलता आहे. याचा गैरफायदा अनेकजण घेत आहेत. जीवनावश्यक वस्तूंसाठी होलसेल व्यापाऱ्यांना मुभा दिली आहे. किरकोळ व्यापाऱ्यांनी घरपोच सेवा द्यावी. असे असताना त्याचे पालन होत नाही. त्यांच्यावर आम्ही कारवाई करत आहोत. तरीसुद्धा रस्त्यावरची वर्दळ कमी करणे मोठे आव्हान आहे. कोरोनाने कुटुंबे उद्ध्वस्त होत असतानाही त्याची नागरिकांना भीती उरली नाही.
- नारायण देशमुख, पोलीस निरीक्षक
चौकट
नऊ ते अकरादरम्यान गर्दी
जीवनावश्यक वस्तू विक्रीसाठी होलसेल व्यापाऱ्यांना सकाळी सात ते अकरापर्यंत मुभा देण्यात आली आहे. व्यापारी मात्र आठच्या पुढे दुकाने उघडतात. त्यामुळे नऊ ते अकरादरम्यान नागरिक रस्त्यावर बाहेर पडतात. यावेळेत गर्दी उसळत आहे.