ट्रॅक्टर मालकांना गंडा घालणाऱ्यास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:34 IST2021-07-07T04:34:01+5:302021-07-07T04:34:01+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : ऊस तोडणी मजूर देण्याचे आमिष दाखवून येथील वाहतूकदार विशाल धनाजी पाटील व त्यांचा मित्र ...

ट्रॅक्टर मालकांना गंडा घालणाऱ्यास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : ऊस तोडणी मजूर देण्याचे आमिष दाखवून येथील वाहतूकदार विशाल धनाजी पाटील व त्यांचा मित्र रवींद्र तुकाराम माने या दोघांना १७ लाख २५ हजारांचा गंडा घालून फरार झालेल्या कुबेर शिवाजी चव्हाण (वय २९, रा. हिंगणी, ता. माण, जि. सातारा) या ठकसेनास विटा पोलिसांनी गजाआड केले.
येथील विशाल पाटील व रवींद्र माने यांनी ऊस वाहतुकीसाठी साखर कारखान्यांशी करार केले होते. त्यांना ऊसतोड मजुरांची गरज होती. संशयित कुबेर चव्हाण याने मजूर पुरविण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून १७ लाख २५ हजारांची रक्कम घेतली; परंतु मजूर न देता रक्कम घेऊन तो फरार झाला. त्यामुळे त्याच्याविरूद्ध दि. ३० डिसेंबर २०२० रोजी विटा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
तो त्याच्या नातेवाईकांच्या जाशी (ता. माण, जि. सातारा) या गावात असल्याची माहिती मिळाल्यानंतर जिल्हा पोलीस प्रमुख दीक्षित गेडाम, अपर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले, पोलीस उपअधीक्षक अश्विनी शेंडगे यांच्या सूचनेनुसार पोलीस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पी. के. कण्हेरे यांच्यासह पोलीस नाईक सचिन खाडे, प्रताप ओंबासे यांच्या पथकाने जाशी गावात छापा टाकून चव्हाण यास अटक केली. त्यास विटा न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
चौकट :
ट्रॅक्टर मालकांची कोटींची फसवणूक...
ऊस तोड मजूर देण्याच्या आमिषाने संशयित कुबेर चव्हाण या ठकसेनाविरुद्ध तासगाव पोलीस ठाण्यात १३ लाख ७५ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल आहे. त्याचबरोबर त्याच्याविरुद्ध कऱ्हाड, पंढरपूर, करमाळा या ठिकाणी देखील फसवणुकीचे अनेक गुन्हे दाखल असून त्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांची अंदाजे एक कोटी रुपयांची फसवणूक केल्याची शक्यता असल्याची माहिती पोलीस निरीक्षक संतोष डोके यांनी दिली.
फोटो - ०६०७२०२१-विटा-कुबेर शिवाजी चव्हाण, (हिंगणी) संशयित.