ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दोघे ठार
By Admin | Updated: May 17, 2015 01:21 IST2015-05-17T01:21:00+5:302015-05-17T01:21:00+5:30
दोघे बचावले : चाबूकस्वारवाडीतील घटना

ट्रॅक्टर विहिरीत कोसळून दोघे ठार
कवठेमहांकाळ : सलगरे (ता. मिरज) येथून खत घेऊन चाबूकस्वारवाडीकडे निघालेला ट्रॅक्टर शनिवारी विहिरीत कोसळून पाण्यात गुदमरून दोघे ठार झाले. तानाजी महादेव आकळे (वय ४७) व विनायक ऊर्फ पप्पू कल्लाप्पा गुंडेवाडी (१८, दोघे रा. चाबूकस्वारवाडी, ता. मिरज) अशी त्यांची नावे आहेत. अन्य दोघांनी प्रसंगावधान राखून विहिरीत ट्रॅक्टर उलटत असतानाच उडी मारली. त्यामुळे त्यांचे जीव वाचले. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
शनिवारी सकाळी चाबूकस्वारवाडी येथील नितीन होनराव यांचा ट्रॅक्टर व छोटी ट्रॉली घेऊन चालक शशिकांत गुंडेवाडी व अन्य तिघे शेतमजूर कोंबडी खत भरण्यासाठी सलगरेस गेले होते. खत भरून ट्रॅक्टर चाबूकस्वारवाडीकडे परतत असताना सलगरेच्या पूर्वेस दीड किलोमीटरवर रस्त्याच्या डाव्या बाजूस असणाऱ्या अण्णासाहेब उतरे यांच्या विहिरीत तो अचानक उलटला. सोबत खताची छोटी ट्रॉलीही कोसळली. चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला.
ट्रॅक्टर विहिरीत उलटत असल्याचे जाणवल्याने चालक शशिकांत गुंडेवाडी व सोबत बसलेले विलास खोत यांनी उडी मारून स्वत:चा जीव वाचविला; परंतु बेसावध असणाऱ्या तानाजी आकळे व विनायक गुंडेवाडी यांना जीव गमवावा लागला. ट्रॅक्टरसह ट्रॉली दोघांच्या अंगावर उलटल्याने पाण्यात गुदमरून त्यांचा मृत्यू झाला.
अपघातावेळी मोठा आवाज झाल्याने उतरे वस्तीजवळील लोकांनी लगेचच विहिरीकडे धाव घेतली; परंतु पूर्ण ट्रॅक्टर विहिरीत बुडाल्याने तातडीने काहीच करता येणे शक्य नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा मोटारीने पाणीउपसा सुरू केला; पण विहीर चाळीस फुटांपर्यंत पाण्याने भरलेली असल्याने या प्रयत्नाला यश आले नाही. दोरखंडाच्या सहायाने मृतदेह बाहेर काढण्यात आले. त्यानंतर माधवनगर येथील खासगी क्रेन मागवून सायंकाळी ट्रॅक्टर व ट्रॉली बाहेर काढण्यात आली.
मृत तानाजी आकळे शेतमजूर असून, त्यांना एक मुलगी व मुलगा आहे. तर विनायक गुंडेवाडी हा अठरा वर्षांचा युवक शेतमजुरी करीत होता.
मृतदेह, ट्रॅक्टर काढताना दमछाक
अपघाताचे वृत्त समजताच लोकांनी घटनास्थळी गर्दी केली. विहिरीतील मृतदेह बाहेर काढण्यासाठी मोठ्या दोरखंडाचा वापर करण्यात आला. यावेळी मनुष्यबळ असूनही लोकांची दमछाक झाली. काहीजण पाण्यात उतरले. दोरखंडाचा वापर करून मृतदेह बाहेर काढण्यात सायंकाळी साडेचारला यश आले. ट्रॅक्टर बाहेर काढण्यासाठी क्रेन आणण्यात आली.(प्रतिनिधी)