औषध समजून विषारी औषध प्राशन
By Admin | Updated: August 12, 2014 23:18 IST2014-08-12T23:01:50+5:302014-08-12T23:18:42+5:30
मणेराजुरीतील घटना : मातेसह दोन मुलांची प्रकृती अत्यवस्थ

औषध समजून विषारी औषध प्राशन
सांगली : आजारावरील औषध पिण्याऐवजी चुकून विषारी औषधाची बाटली हाती लागल्याने त्यातील विषारी औषध प्राशन केल्याने महिलेसह तिच्या दोन मुलांची प्रकृती अत्यवस्थ बनली आहे. मणेराजुरी (ता. तासगाव) येथे आज (मंगळवार) दुपारी ही घटना घडली. सुनंदा राहुल कुचेकर (वय २६) व त्यांची मुले सानिका (४), शुभम (६) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गेल्या चार दिवसांपासून सुनंदा व त्यांची मुले आजारी आहेत. सर्दी, ताप व खोकल्याचा त्रास सुरू होता. त्यांनी स्वत:सह मुलांचीही गावातील डॉक्टरांकडून तपासणी करुन घेतली होती. डॉक्टरांनी औषधे लिहून दिली होती. ती त्यांनी औषध दुकानातून खरेदी केली होती. औषधांच्या बाटल्या त्यांनी घरातील कपाटामध्ये ठेवल्या होत्या. दुपारी त्यांनी औषधे खाण्यासाठी बाटल्या घेतल्या. स्वत: औषध घेऊन, मुलांनाही त्यांनी पाजले. दहा ते पंधरा मिनिटांनी त्यांना मळमळ व उलट्यांचा त्रास सुरू झाला. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की, चुकून आपण औषध पिण्याऐवजी विषारी औषध प्राशन केले आहे. घरातील लोकांना त्यांनी हा प्रकार सांगितला.
सुरुवातीला त्यांना गावातील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल केले होते. प्राथमिक उपचारानंतर त्यांना सायंकाळी सांगलीच्या वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथे अतिदक्षता विभागात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. प्रकृती स्थिर असून, धोका टळला असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
एक ते दोन चमचे विषारी औषध या तिघांच्याही पोटात गेले आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी या घटनेची माहिती तासगाव पोलिसांना दिली. तेथील पोलिसांचे पथक तातडीने सुनंदा यांचा जबाब घेण्यासाठी रुग्णालयात दाखल झाले होते. (प्रतिनिधी)
औषधाऐवजी विषारी औषध
तासगाव पोलिसांनी सुनंदा यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. यामध्ये त्यांनी सांगितले आहे की, घरात कीटकनाशक औषधांच्या बाटल्या मोठ्या प्रमाणात आहेत. शेतात पिकांवर फवारणी करण्यासाठी ही औषधे घरी ठेवण्यात आली आहेत. या औषधांशेजारीच डॉक्टरांनी दिलेल्या औषधांच्या बाटल्या ठेवल्या होत्या. त्यामुळे चुकून त्यातील विषारी औषधाची एक बाटली हाती लागली. त्यातीलच औषध स्वत: घेतले व मुलांनाही पाजले आहे.