धर्मस्थळे बंद असल्याने पर्यटक घरातच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:30 IST2021-08-24T04:30:40+5:302021-08-24T04:30:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : पर्यटन बंदी हटली तरी देशभरातील महत्त्वाची धर्मस्थळे मात्र कुलूपबंदच आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम पर्यटनावर ...

धर्मस्थळे बंद असल्याने पर्यटक घरातच
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : पर्यटन बंदी हटली तरी देशभरातील महत्त्वाची धर्मस्थळे मात्र कुलूपबंदच आहेत. त्याचा प्रतिकूल परिणाम पर्यटनावर झाला आहे. लांबच्या सहलींसाठी पर्यटक अद्याप बाहेर पडलेले नाहीत.
देशांतर्गत बहुतांश पर्यटन धर्मस्थळांभोवतीच केेंद्रित आहे. पर्यटनाच्या हंगामात दक्षिण व उत्तर भारतात धार्मिक स्थळांसाठी प्रवासी कंपन्यांच्या गाड्या भरभरून धावतात. देवदर्शन आणि त्याच्यासोबत निसर्ग पर्यटन असा प्रवाशांचा हेतू असतो. जुलैमध्ये हंगाम सुरू झाल्यानंतर काशी विश्वनाथाला पर्यटक वाढले, अन्यत्र मात्र हंगाम सुरू नाही. मंदिरेच बंद असल्याने अन्य पर्यटनालाही ‘खो’ बसला आहे.
वेगवेगळ्या राज्यांत प्रवेशासाठी वेगवेगळे नियम आहेत. काही ठिकाणी दोन लसींचे डोस घेणे पुरेसे आहे, तर काही ठिकाणी ७२ तासांतील आरटीपीसीआर चाचणी सक्तीची आहे. या गोंधळामुळेही पर्यटक बाहेर पडायला तयार नसल्याचे पर्यटन व्यावसायिकांनी सांगितले.
तिरुपतीला बालाजी दर्शनासाठी खूपच मोठ्या संख्येने भाविक पर्यटक जातात, पण मंदिर बंद असल्याने रेल्वे रिकाम्या धावताहेत. काही पर्यटकांनी त्याऐवजी अयोध्येला पसंती दिली आहे. महाराष्ट्रात शिर्डी, शेगाव, पंढरपूर, तुळजापूर, अक्कलकोट, कोल्हापूर आदी धर्मस्थळांमध्येही शुकशुकाट आहे, त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसला आहे.
चौकट
ही धार्मिक स्थळे बंद आहेत
बद्रिनाथ, केदारनाथ, बुद्ध गया, महाराष्ट्रात शिर्डी, शेगावसह राजस्थान व गुजरातमधील सर्व मंदिरे बंद आहेत. शिवाय परदेशी पर्यटनही बंद आहे.
चौकट
ही धर्मस्थळे सुरू आहेत.
तिरुपती बालाजी येथे केवळ ऑनलाईन बुकिंग करून दर्शन सुरु आहे. कुरवपूर, पीठापूर, गोकर्ण महाबळेश्वर, मुर्डेश्वर, वाराणसीचे काशी विश्वनाथ मंदिर, अयोध्या सुरू आहे. याशिवाय लेह, लडाख, कुलू मनालीही सुरू आहे.
कोट
मंदिरे बंद असल्याने पर्यटकांनी राज्यातच छोट्या सहलींना प्राधान्य दिले आहे. काशी विश्वनाथ मंदिर सुरू असले तरी बद्रिनाथ, केदारनाथ बंद असल्याने पर्यटकांचा ओघ रोडावला आहे. दिवाळीनंतर पर्यटक बाहेर पडतील, असा अंदाज आहे.
- शिरीष रेळेकर, पर्यटन व्यावसायिक, सांगली