कासेगावच्या सत्ताधाऱ्यांची विरोधकांसह सहल

By Admin | Updated: June 13, 2016 00:15 IST2016-06-12T22:43:47+5:302016-06-13T00:15:20+5:30

ग्रामस्थांतून आश्चर्य : एकमेकांच्या हातात हात घालून केलेल्या सफरीचे छायाचित्र व्हायरल

Tour with the opponents of Kasegaon | कासेगावच्या सत्ताधाऱ्यांची विरोधकांसह सहल

कासेगावच्या सत्ताधाऱ्यांची विरोधकांसह सहल

प्रताप बडेकर --\ कासेगाव (ता. वाळवा) येथील प्रत्येक निवडणुकीत सत्ताधारी आणि विरोधकांत टोकाचा संघर्ष राहिला आहे. गावातील कार्यक्रमांतही ते कधी एकत्र दिसत नाहीत. असे असताना ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील यांचे कट्टर विरोधक नेताजी पाटील यांनी नुकताच कोकण सहलीचा आनंद लुटला. या सहलीची छायाचित्रे सध्या व्हॉटस् अ‍ॅपवर फिरत असून, सत्ताधारी-विरोधक एक झाले का?, या चर्चेला उधाण आले आहे.
कासेगाव हे माजी मंत्री, आमदार जयंत पाटील यांचे गाव असल्याने राजकीयदृष्ट्या गावाला विशेष महत्त्व आहे. सर्व सत्तास्थाने जयंतरावांच्या गटाकडे असली तरी, गावात विरोधकही प्रबळ आहेत. याचा प्रत्यय लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आला आहे. असे असले तरी सत्ताधारी व विरोधकांत अधून-मधून फिलगुडचे वातावरणही दिसते. याचा प्रत्यय ग्रामस्थांना वेळोवेळी आला आहे.
काही दिवसांपूर्वी सत्ताधारी गटातील ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य सुजित पाटील, अमृत पाटील व विरोधी गटातील नेताजी पाटील, सुरेश माने यांनी समर्थकांसह विजापूर, रत्नागिरी, जत भागाची सहल ‘एन्जॉय’ केली. प्रेक्षणीय स्थळांना भेटी देऊन मनमुराद आनंद लुटला.
वास्तविक मागील ग्रामपंचायत निवडणुकीत दोन्ही गटामध्ये संघर्ष निर्माण झाला होता. सुजित पाटील यांनी ज्ञानदेव पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव केला होता, तर सुरेश माने काठावर पराभूत झाले होते. नेताजी पाटील यांनी जिल्हा परिषद निवडणुकीत देवराज पाटील यांना थेट आव्हान दिले होते. आजही देवराज पाटील यांचे कट्टर विरोधक म्हणून ते ओळखले जातात. त्यामुळे या सहलीची चर्चा रंगू लागली आहे.

Web Title: Tour with the opponents of Kasegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.