सरसकट लाॅकडाऊन, मग अनलाॅकला नियम का?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:34 IST2021-06-09T04:34:40+5:302021-06-09T04:34:40+5:30
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करताना प्रशासनाकडून कोणताही निकष लावला जात नाही. मग अनलाॅक करताना निकष कशासाठी, असा सवाल ...

सरसकट लाॅकडाऊन, मग अनलाॅकला नियम का?
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन करताना प्रशासनाकडून कोणताही निकष लावला जात नाही. मग अनलाॅक करताना निकष कशासाठी, असा सवाल करून, जिल्हा प्रशासनाने व्यापाऱ्यांच्या जिवाशी खेळ थांबवून तातडीने व्यवहार सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी मंगळवारी केली.
शहा म्हणाले की, अनलाॅकसाठी शासनाने पाच निकष निश्चित केले आहेत. सांगली जिल्हा हा चौथ्या स्तरावर आहे. पण जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती पाहता, जिल्ह्याचा तिसऱ्या स्तरात समावेश करणे उचित होते. पाॅझिटिव्हिटी दर व ऑक्सिजन बेडची उपलब्धता यावर शासनाने स्तर निश्चित केले आहेत. पाॅझिटिव्हिटी दरात केवळ एक ते दोन टक्क्यांचा फरक आहे, तर बेडची उपलब्धता तिसऱ्या स्तरातील निकषाप्रमाणे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यवहार सुरळीत करण्याची आवश्यकता होती. पण प्रशासनाने त्यावर निर्णय घेतलेला नाही. बाजारपेठेतील ६५ टक्के दुकाने सुरू झाली आहेत. नागरिकांची गर्दी दिसत आहे. ज्या दुकानात गर्दी होती, ती उघडली आहेत आणि जी दुकाने मोठी असून गर्दी होत नाही, ती बंद आहेत. या निकषामुळे लाखो व्यापाऱ्यांची उपजीविका अडचणीत आली आहे. सरसकट लॉकडाऊनवेळी कोणतेच निकष नसतात आणि अनलाॅक मात्र सरसकट केला जात नाही. ही बाब अन्यायकारक आहे. जिल्ह्यातील कोरोना स्थितीचा आढावा घेऊन जिल्हा प्रशासनाने तातडीने स्वतंत्र निर्णय घेत सर्व व्यवहार सुरू करावेत, अशी मागणी शहा यांनी केली.