सहकार पॅनेलमध्ये दबक्या आवाजात नाराजीचा सूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:20 IST2021-06-02T04:20:57+5:302021-06-02T04:20:57+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क इस्लामपूर : सत्ताधारी सहकार पॅनेलने सांगली जिल्ह्यातील तिन्ही गटांतील उमेदवार निश्चित केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. ...

सहकार पॅनेलमध्ये दबक्या आवाजात नाराजीचा सूर
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : सत्ताधारी सहकार पॅनेलने सांगली जिल्ह्यातील तिन्ही गटांतील उमेदवार निश्चित केल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे उमेदवारी न मिळालेल्यांत दबक्या आवाजात नाराजीचा सूर उमटत आहे. संस्थापक आणि रयत पॅनेलकडूनही प्रत्येक गटात अर्ज दाखल झाले आहेत. या दोन्ही पॅनेलच्या मनोमिलनाकडे सभासदांचे लक्ष आहे.
वाळवा तालुक्यात बोरगाव-रेठरे हरणाक्ष सर्वांत मोठा गट आहे. या गटातील सहकार पॅनेलचे सर्व उमेदवार निश्चित झाल्याचे समजते. जितेंद्र पाटील (बोरगाव), जे. डी. मोरे (रेठरे हरणाक्ष), अविनाश खरात (खरातवाडी), जयश्री पाटील (बहे), संजय पाटील (इस्लामपूर) ही नावे निश्चित झाल्याचे खात्रीशीर वृत्त अहे. परंतु, बोरगाव येथील बापू बिरू वाटेगावकर यांचे नातू शिवाजी वाटेगावकर हेही आता सहकार पॅनेलकडून उमेदवारीच्या तयारीत आहेत. त्यांना डावलले तर त्यांच्या गटात नाराजी उमटण्याची शक्यता आहे. विद्यमान संचालक अमोल गुरव (बहे), सुजित मोरे (रेठरे हरणाक्ष) आणि कामेरीतील इच्छुकांना डावलल्याने त्यांच्या समर्थकांत दबक्या आवाजात नाराजीचा सूर आहे.
अशीच अवस्था नेर्ले-तांबवे गटात आहे. लिंबाजी पाटील (तांबवे) यांना उमेदवारी दिल्याने मदन मोहिते यांचे कट्टर समर्थक दीपक पाटील गटात नाराजी असल्याची चर्चा आहे. संभाजी पाटील (नेर्ले) यांचे नाव यापूर्वीच निश्चित मानले जाते. महाडिक गटाकडून इंदुमती दिनकर जाखले यांचे नाव निश्चित झाले आहे. महाडिक गटाचे कट्टर समर्थक वैभव जाखले यांच्या त्या मातोश्री आहेत. परंतु, महाडिक गटातील विद्यमान संचालक गिरीश पाटील, मंगल मोहन पाटील यांनी उमेदवारीची तयारी केली होती. यातूनही नाराजी उफाळण्याची शक्यता असल्याने महाडिक गटाला स्वीकृत संचालकपद देण्याचे आश्वासन सहकार पॅनेलकडून मिळाल्याचे बोलले जात आहे.
येडेमच्छिंद्र-वांगी गटात सहकार पॅनेलकडून शिवाजी पाटील (येडेमच्छिंद्र) यांचे नाव निश्चित आहे. बाबासाहेब शिंदे (देवराष्ट्रे), विद्यमान संचालक ब्रिजराज मोहिते (वांगी), रामभाऊ देशमुख (वांगी) इच्छुक आहेत. यावर शिक्कामोर्तब करण्याचे आव्हान सहकार पॅनेलपुढे आहे.
चौकट
नेर्ले-तांबवे गटातून कापूसखेडचे माजी सरपंच प्रदीप पाटील यांनी मोर्चेबांधणी केली; परंतु त्यांचा भ्रमनिरास झाला आहे. दिवंगत जयवंतराव भोसले यांना मानणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्यांनाही विचारात घेतलेले नाही. माजी अध्यक्ष मदनराव मोहिते सहकार पॅनेलमध्ये गेले आहेत. त्यांचाही गट वाळवा तालुक्यात आहे. त्यात नाराजीची चर्चा आहे.