आटपाडीकरांना गढूळ पाणी

By Admin | Updated: September 22, 2015 00:09 IST2015-09-21T23:10:32+5:302015-09-22T00:09:45+5:30

नेते गायब, ग्रामस्थ संतप्त : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

Tomato water to the Atpadikar | आटपाडीकरांना गढूळ पाणी

आटपाडीकरांना गढूळ पाणी

अविनाश बाड - आटपाडी येथे गेल्या आठवड्यात पडलेल्या थोड्या पावसाने तलावातील पाणी गढूळ झाले आहे. तेच पाणी आटपाडीतील ३२ हजार ७८० नागरिकांना चक्क पिण्यासाठी पुरवठा केले जात आहे. वीज कंपनीने आटपाडीकरांना १६ कोटींच्या योजनेस वीज कनेक्शन न देऊन वेठीस धरले आहे. तेव्हा नेते हो, आम्ही अजून किती दिवस प्यायचे गढूळ पाणी, असा संतप्त सवाल नागरिकांतून व्यक्त केला जात आहे.
आटपाडी ग्रामपंचायतीच्या कृपेनेच नागरिकांना ८ ते १० दिवसांतून एकदा पाणी मिळते. आटपाडीच्या तलावात गेले वर्षभर साठवून ठेवलेले पाणी गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे गढूळ झाले आहे आणि हेच पाणी पिण्यासाठी सोडले जात आहे. तसेच या पाण्याला तीव्र दुर्गंधीही येत आहे. भांड्यात साठवून ठेवलेल्या पाण्यामध्ये अळ्या होत आहेत. या पाण्यामुळे नागरिकांच्या घरातील पाण्याचे फिल्टर बंद पडून नादुरुस्त झाले आहेत. फिल्टरला वॉरंटी असल्यामुळे दुरुस्तीसाठी कंपनीकडे गेले असता, आम्ही पिण्याचं पाणी शुद्ध करतो, गटारीचे नाही, अशी अजब उत्तरे नागरिकांना ऐकून घ्यावी लागत आहेत. जलशुद्धीकरण प्रकल्पासह पूर्ण असलेल्या भारत निर्माण योजनेतून केलेली नवी पाणीपुरवठा योजना ग्रामपंचायतीच्या थकबाकीमुळे वीज कनेक्शन न दिल्यामुळेच सुरू होऊ शकत नाही.
थकबाकीतील अंशत: रक्कम भरण्यासाठी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह देशमुख आणि जिल्हा परिषदेच्या महिला बालकल्याण समिती सभापती उज्वला लांडगे यांनी एकूण साडेसात लाख रुपयांचा स्वीय निधी देण्यासाठी पत्र दिले आहे. जिल्हा परिषदेच्या लाल फितीतून निधीच्या या फायली गेल्या आठवड्याभरापासून या कार्यालयातून त्या कार्यालयात फिरत आहेत.
सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ही रक्कम देण्याची हमी जबाबदार पदाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर आणि त्याची कारवाई सुरू झाल्यानंतरही वीज वितरण कंपनीचे अधिकारी जागचे हलायला तयार नाहीत. अजूनही ही रक्कम जमा केली जाईल, यावर या कर्तव्यदक्ष (?) अधिकाऱ्यांचा विश्वास का बसत नाही? या अधिकाऱ्यांच्या वेळकाढूपणामुळे पिण्याच्या पाण्याचे हाल सुरू आहेत, हे त्यांना दिसत नाही का, असा संतापजनक सवाल होत आहे.
प्रशासन, अधिकारी याबाबत कमालीची बेफिकिरी दाखवित असताना, या भागातील नेते काय करीत आहेत? असा संतप्त सवालही नागरिकांतून व्यक्त होत आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत आणि अनेकवेळा आटपाडीची बारामती, अकलूज, इस्लामपूर करू म्हणणारे नेते आता कुठे आहेत? विधानसभा निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देणारे नेते आता का गप्प आहेत? असा प्रश्नही नागरिक विचारत आहेत.

शहाणपण दे गा देवा!
सध्या आटपाडीत गणेशोत्सवाची धूम सुरु आहे. दररोज सकाळी-सायंकाळी आरतीसाठी भावी नगरसेवक म्हणून अनेकजणांची नावे पुकारली जात आहेत. अजून नगरपंचायत व्हायची आहे. काही जणांनी तर मनातल्या मनात नगराध्यक्ष पदाची खुर्चीही पटकावली आहे. अण्णा-बापू युवा शक्तीने नुकतीच झोकात दहीहंडी करुन डीजेच्या तालावर शेकडो तरुणांना नाचविले. पण यातले कुणीच आता, आटपाडीकर दररोज गढूळ पाणी पिऊन त्रस्त असतानाही काही करताना दिसून येत नाहीत.

Web Title: Tomato water to the Atpadikar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.