कडेगावात आज गगनचुंबी ताबुतांच्या भेटी
By Admin | Updated: October 24, 2015 00:25 IST2015-10-23T23:31:06+5:302015-10-24T00:25:38+5:30
मोहरमनिमित्त आयोजन : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

कडेगावात आज गगनचुंबी ताबुतांच्या भेटी
कडेगाव : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून देशभर ओळख असलेल्या कडेगाव (जि. सांगली) येथील मोहरमच्या गगनचुंबी ताबुतांच्या भेटी शनिवार, दि. २४ रोजी होत आहेत.कडेगावातील मोहरमच्या ताबूत भेटींना १५० वर्षांची परंपरा आहे. या यात्रेत प्रथम देशपांडे, पाटील, कळवात व सातभाई असे तीन-चार ताबूत असत. कालांतराने १२ बलुतेदारांनाही या यात्रेमध्ये सामील करून घेण्यात आले. देशपांडे, पाटील, कळवात व सातभाई या मानाच्या व मोठ्या ताबुतांसह बागवान, सुतार, शेटे या सर्व ताबुतांची उंची शंभर ते दीडशे फूट असते. इतर सर्व ताबुतांची उंची त्या मानाने कमी असते.
बकरी ईदनंतर ताबुतांच्या बांधणीला सुरुवात होते. प्रतिपदेचा चंद्र पाहून कुदळ मारली जाते. ताबुताची बांधणी वैशिष्ट्यपूर्णअसते. आधी कळस मग पाया, या तत्त्वावर ताबुताची बांधणी होते. यामध्ये अष्टकोनी आकाराचे बांबू-कामट्याचे मजले तयार करतात. शुक्रवार पेठ मेल व बुधवार पेठ मेल अशी दोन मेल मंडळे गावात पूर्वीपासून आहेत. या मंडळातील लोक मोहरमच्या ५ तारखेला मशिदीत जाऊन फकीर होतात. दुसऱ्या दिवशी भराचे सोंग असते. दोन्ही मेल मंडळातील लोक सायंकाळी सात वाजल्यापासून रात्री दहापर्यंत गावातून गाणी म्हणत फिरतात. ताबूत उचलण्याचा पहिला मान हिंदूंना आहे. ताबुताचे विसर्जन केले जात नाही.
यंदा मोहरमच्या भेटी पाहण्यासाठी राज्यभरातून येणाऱ्या भाविकांची संख्या पाहता, जुन्या पोलीस ठाण्यासमोरील मैदान मोकळे करण्यात आले आहे. मोहरमच्या पार्श्वभूमीवर ग्रामपंचायतीने सर्व प्रकारची दक्षता घेतली आहे, असे सरपंच राजू जाधव यांनी सांगितले.
सकाळी दहापासून दुपारी एकपर्यंत मिरवणुका व नंतर भेटी होणार आहेत. मोहरम भेटीच्या पार्श्वभूमीवर पोलीस खात्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. दोनशे पोलिसांचा फौजफाटा बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आला आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर मोहरम चौकाकडे जाणारे निमसोड, शिवाजीनगर रस्ते पोलिसांनी बंद केले आहेत.
यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची पार्किंग व्यवस्था तहसील कार्यालय तसेच महात्मा गांधी विद्यालय परिसरात करण्यात आली आहे. (वार्ताहर)
हजारो भाविक येणार
मोहरम यात्रेनिमित्त माजी मंत्री आमदार डॉ. पतंगराव कदम, माजी आमदार पृथ्वीराज देशमुख उपस्थित राहणार आहेत. गृहराज्यमंत्री राम शिंदे मोहरम यात्रेनिमित्त कडेगाव नगरीस भेट देणार आहेत. त्याशिवाय शासकीय, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांसह हजारो भाविक मोहरम यात्रेनिमित्त कडेगाव येथे येणार आहेत.