भिलवडी : सांगली येथील वसंतदादा शेतकरी साखर कारखान्याच्या प्रशासनाने गेल्या दोन गळीत हंगामातील उसाचे बिल अद्यापही न दिल्याने संतप्त झालेले पलूस तालुक्यातील शेतकरी व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शुक्रवार, दि. १८ सप्टेंबरला कारखान्यावर धडक मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती पलूस पंचायत समितीचे सदस्य संदीप राजोबा यांनी दिली. वसगडे (ता. पलूस) येथे आयोजित शेतकऱ्यांच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, २०१३-२०१४ या हंगामातील अखेरीस ऊस पाठविलेल्या शेतकऱ्यांना एकूण बिलाच्या ६० टक्के, काहींना ४० टक्के, तर काहींना २० टक्के याप्रमाणात बिले दिली गेली. कारखान्याची आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर बिले देऊ, अशी बोळवण संचालक मंडळाने केली. मागील थकित बिले आता तरी मिळतील, या आशेवर शेतकऱ्यांनी पुन्हा २०१४-२०१५ या हंगामात गाळपासाठी ऊस कारखान्याला पाठविला, पण आजअखेर कारखान्याने एक रुपयाही बिल शेतकऱ्यांना दिले नाही. केवळ वसंतदादांच्या नातवंडांच्या मर्जीतील मोजक्याच लोकांची बिले देऊन हितसंबंध सांभाळले गेले. शुक्रवारी वसगडेत सकाळी नऊ वाजता एकत्रित येऊन मोटारसायकल रॅलीसह सांगली कारखान्यावर धडक मोर्चा काढणार आहेत. यावेळी शिवाजी जाधव, सुनील पाटील, संदीप पाटील, सुधीर खोत, अजित पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)
वसंतदादा कारखान्यावर आज मोर्चा
By admin | Updated: September 18, 2015 00:09 IST