शिक्षक बँकेसाठी आज मतदान
By Admin | Updated: April 25, 2015 00:12 IST2015-04-25T00:10:18+5:302015-04-25T00:12:05+5:30
तयारी पूर्ण : २६ केंद्रांवर नियोजन; बंदोबस्त तैनात

शिक्षक बँकेसाठी आज मतदान
सांगली : सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक बँकेसाठी शनिवारी मतदान होत आहे. मतदानाची संपूर्ण तयारी पूर्ण केली आहे. जिल्ह्यातील एकूण २६ मतदान केंद्रांवर ५ हजार ९६७ मतदार मतदानाचा हक्क बजाविणार आहेत. मतदानासाठी पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.
शिक्षक बँकेसाठी यंदा चौरंगी लढत आहे. शिक्षक संघातील शिवाजीराव पाटील व संभाजीराव थोरात गट, शिक्षक समितीचे नेते विश्वनाथ मिरजकर गट व परिवर्तन पॅनेलमध्ये चुरशीची लढत होत आहे. आरोप-प्रत्यारोपांनी बँकेच्या निवडणुकीचा रागरंगच बदलला आहे. गेल्या पाच वर्षातील शिक्षक समिती व थोरात गटाच्या कारभारावर शि. द. पाटील यांनी हल्लाबोल केला होता, तर शि. द. पाटील यांच्या काळातील घोटाळे बाहेर काढत समिती व थोरात गटाने त्याला प्रत्युत्तर दिले आहे. गेल्या आठ दिवसात उमेदवारांकडून संपूर्ण जिल्हा पिंजून काढण्यात आला आहे. बँकेच्या कारभारासोबतच वैयक्तिक टीका-टिपणीवर चारही गटांनी भर दिला. त्यामुळे निवडणुकीत आणखी चुरस निर्माण झाली आहे. (प्रतिनिधी)
पाच हजार ९६७ मतदार
बँकेच्या २१ जागांसाठी पाच हजार ९६७ मतदार असून शनिवारी २६ केंद्रांवर मतदान होत आहे. सांगली, मिरज, विटा, आटपाडी, इस्लामपूर, शिराळा, कवठेमहांकाळ या तालुक्यांच्या ठिकाणी प्रत्येकी दोन मतदान केंद्रे आहेत, तर जतमध्ये तीन, संख, आष्टा, भिलवडी, कडेगाव, पलूस येथे एक मतदान केंद्र आहे.