इस्लामपूर: वाघवाडी (ता. वाळवा) येथील फाट्यावरील संतोष भगवान दमामे (रा. बहे) यांच्या मालकीच्या वाहन तळावर लावलेल्या एका डंपरच्या डिस्कसह चार टायर आणि १४९ लिटर डिझेल अशा ७० हजार रुपये किमतीच्या मुद्देमालाची चोरट्यांनी चोरी केली. ही घटना शनिवारी रात्री ते रविवारी पहाटेदरम्यान घडली.
दमामे यांचा रेठरेधरण गावच्या हद्दीत स्टोन क्रशरचा व्यवसाय आहे. त्यांची वाहने वाघवाडी सेवा रस्त्यालगत असणाऱ्या जागेत उभी असतात. शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास ही वाहने चालक अर्जुन कोळी आणि रमेश वडर यांनी लावली होती. रात्री दमामे यांनीसुद्धा ही वाहने आपल्या जागेत थांबल्याचे पाहिले होते. रविवारी सकाळी त्यांच्या वाहनावरील चालक अर्जुन कोळी (बहे) हा तेथे गेल्यावर एका डंपरच्या डिस्कसह चार टायर आणि त्यातील डिझेलची चोरी झाल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याने दमामे यांना या घटनेची माहिती दिली. या घटनेची फिर्याद संतोष दमामे यांनी पोलिसात दिली आहे. हवालदार पाटील अधिक तपास करत आहेत.