विद्यापीठ उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी गुरुवारी बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:33 IST2021-07-07T04:33:41+5:302021-07-07T04:33:41+5:30
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीतर्फे तीव्र लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी सांगली, मिरजेतील ...

विद्यापीठ उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी गुरुवारी बैठक
सांगली : शिवाजी विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी विद्यापीठ उपकेंद्र कृती समितीतर्फे तीव्र लढा उभारला जाणार आहे. त्यासाठी सांगली, मिरजेतील लोकप्रतिनिधी, शिक्षण संस्थाचालक, विद्यार्थी व पालकांची संयुक्त बैठक आयोजित केली आहे. गुरुवारी (दि. ८) दुपारी चार वाजता पंचमुखी मारुती रस्त्यावर कष्टकऱ्यांची दौलत येथे ती होईल, अशी माहिती कृती समितीचे निमंत्रक ॲड. अमित शिंदे यांनी दिली.
विद्यापीठाचे उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी विद्यार्थी संघटनांच्या प्रतिनिधींनी उपकेंद्र कृती समितीच्या माध्यमातून लढा सुरू केला आहे. शिक्षणमंत्र्यांनी बस्तवडे (ता. तासगाव) येथील जागेला तत्त्वतः मान्यता दिल्याचे जाहीर केले आहे. मात्र, विद्यापीठाने यापूर्वीच जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात जिल्हा मुख्यालयापासून २५ किलोमीटरच्या परिघात ७५ ते १०० एकर जागा मागितली होती. विद्यापीठ कायद्यातील तरतुदीनुसार हे उपकेंद्र जिल्ह्याचे प्रवेशद्वार असेल. जिल्ह्याचा भौगोलिक विस्तार, विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये, विद्यार्थी, दळणवळणाच्या सोयींचा विचार करता उपकेंद्र जिल्ह्याच्या ठिकाणीच आवश्यक आहे.
ॲड. शिंदे म्हणाले की, जिल्ह्याच्या शहरात सर्व मुख्य कार्यालये असतात; परंतु विद्यापीठ उपकेंद्र म्हणजे दुष्काळ निवारणाचे साधन असल्याप्रमाणे मागणी केली जात आहे. शिक्षणमंत्र्यांनीही कोणालाच विश्वासात न घेता परस्पर निर्णय जाहीर केला आहे. तो नियमबाह्य आहे. याविरोधात व्यापक लढ्यासाठी उपकेंद्र कृती समितीने गुरुवारी संयुक्त बैठक आयोजित केली आहे. उपकेंद्र सांगलीत होण्यासाठी तीव्र आंदोलनाची दिशा यावेळी निश्चित करणार आहे.
यावेळी जयंत जाधव, राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शुभम जाधव, महालिंग हेगडे, शुभम ठोंबरे, रोहित शिंदे, दिग्विजय कांबळे, आदित्य नाईक, प्रवीण कोकरे, ॲड. जगदीश लिमये, अल्ताफ पटेल, संतोष शिंदे, अक्षय दासरी, तेजस नांद्रेकर, अभिषेक खोत आदी उपस्थित होते.
चौकट
प्रसंगी अनुदान आयोगाकडे तक्रार
ॲड. शिंदे म्हणाले की, नियमांचे उल्लंघन करून उपकेंद्र सांगलीबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्यास प्रसंगी विद्यापीठाविरोधात अनुदान आयोगाकडे तक्रार करू.