एलबीटी भरण्यास थंडा प्रतिसाद
By Admin | Updated: May 17, 2015 01:17 IST2015-05-17T01:17:04+5:302015-05-17T01:17:04+5:30
महापालिकेला मोठा फटका

एलबीटी भरण्यास थंडा प्रतिसाद
सांगली : एलबीटीप्रश्नी राज्य शासनाने अभय योजनेला दिलेली मोठी मुदत आणि कारवाई थांबविण्याचे आदेश यामुळे महापालिकेला मोठा फटका बसला आहे. गेल्या दोन दिवसांपासून एलबीटी भरण्यासाठी व्यापाऱ्यांनी थंडा प्रतिसाद दिल्याचे चित्र आहे. दररोज केवळ सुमारे ११ लाखांचीच वसुली होत आहे.
एलबीटीविरोधी कृती समितीने केलेल्या बहिष्कार आंदोलनामुळे महापालिका दोन वर्षांपासून आर्थिक अडचणीत सापडली आहे. महापालिकेला डोलारा कोसळला असतानाच दंड व व्याजमाफीच्या शासन निर्णयामुळे ६० कोटी रुपयांवर प्रशासनाला पाणी सोडावे लागणार आहे. त्यातच थकबाकीदार व्यापारी व विवरणपत्र न भरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाईसाठी तयारी सुरू असतानाच शासनाने अभय योजनेचा लाभ घेऊ पाहणाऱ्या व्यापाऱ्यांवर कोणत्याही प्रकारची कारवाई करू नये, अशा सूचना केल्या आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अडचणीत भर पडली आहे. (प्रतिनिधी)