जतमध्ये वाहतुकीचे तीनतेरा
By Admin | Updated: October 23, 2014 22:52 IST2014-10-23T21:19:59+5:302014-10-23T22:52:18+5:30
पोलिसांची बघ्याची भूमिका : वाहनधारकांची तारेवरची कसरत

जतमध्ये वाहतुकीचे तीनतेरा
जत : जत शहरातील मुख्य रस्त्यावर सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. पण वाहतूक पोलीस बघ्याची भूमिका घेत आहेत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्त्यावरून ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. जत पोलिसांनी गांधारीची भूमिका घेतल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त केली जात आहे.
विजापूर ते गुहागर राज्यमार्ग जत शहरातून जातो. या रस्त्याच्या दोन्ही बाजूला अतिक्रमण वाढले आहे. त्यामुळे हा रस्ता अरूंद होऊन येथे सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. या रस्त्यालगत असलेले अतिक्रमण काढल्यास काही प्रमाणात येथील वाहतूक व्यवस्था सुरळीत होणार आहे.
शहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे.
त्यामुळे रस्ता अरूंद होऊन सतत वाहतूक कोंडी निर्माण होत आहे. तसेच काही वेळा लहान-मोठे अपघात होत आहेत. या गर्दीचा फायदा घेऊन भुरटे चोर हातोहात दागिने, रोख रक्कम लंपास करीत आहेत. याचा आर्थिक फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे.
तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती. याशिवाय त्यांच्या कार्यकालावधित शहरातील अतिक्रमण काढून रस्ते खुले करण्यात आले होते. त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे.
मंगळवार व गुरुवार या बाजाराच्या दिवशी आणि सणाचा बाजार असेल तर मुख्य बाजारपेठेत गर्दी होते. काहीवेळा मुख्य चौकातच काही हातगाडीवाले आपला गाडा लावून ठाण मांडतात. एखाद्या दोनचाकी अथवा चारचाकी वाहन चालकाने त्यांना हातगाडी बाजूला घेण्याची विनंती जरी केली तरी, त्यांच्याशी ते हुज्जत घालतात. येथे वाहतूक पोलीस कधीच
फिरकत नाहीत. परंतु
गावाबाहेरील मुख्य रस्त्यावर त्यांची उपस्थिती नियमित असते. यामागील गौडबंगाल काय आहे?, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. (वार्ताहर)
वाहतूक पोलिसांच्या भूमिकेचा संशय
शहरातील महाराणा प्रताप चौक, जयहिंद चौक, गांधी चौक, वाचनालय चौक व दगडी पूल या एकमेकाशी जोडणाऱ्या रस्त्यावर आणि मुख्य चौकात हातगाडीवाले आणि टपरी धारकांनी आपले बस्तान कायमस्वरुपात येथे बसविले आहे.
तत्कालीन प्रशिक्षणार्थी पोलीस अधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी जत नगरपालिकेचे सहकार्य घेऊन मुख्य रस्त्याच्या दोन्ही बाजूला पांढरे पट्टे मारून व्यावसायिकांना तेथे बसण्याची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था काही दिवस सुरळीत सुरू होती.
त्यानंतर नगरपालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळे सध्या जैसे थे परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागत आहे.