पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटविले

By Admin | Updated: October 25, 2015 00:46 IST2015-10-25T00:45:55+5:302015-10-25T00:46:15+5:30

कवठेमहांकाळची घटना : अज्ञाताचे कृत्य; वाळूच्या दोन ट्रकचा समावेश

Three trucks outside the police station were lit | पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटविले

पोलीस ठाण्याबाहेर तीन ट्रक पेटविले

कवठेमहांकाळ : कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारातील तीन ट्रक अज्ञातांनी शनिवारी पहाटे पेटवून दिले. तिन्ही ट्रकच्या केबिन जळून खाक झाल्या, तर टायरचेही नुकसान झाले. वाळूने भरलेल्या दोन ट्रकचा त्यात समावेश आहे. या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, सुमारे १० ते १२ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
दीड महिन्यापूर्वी सोलापूर जिल्ह्यातील बेगमपूर येथून बेकायदा वाळू भरून दोन ट्रक कोल्हापूरकडे निघाले असता, कवठेमहांकाळ तहसील कार्यालयाच्या पथकाने ते पकडले होते. दंडात्मक कारवाई करण्याच्या हेतूने हे ट्रक कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याच्या आवारात लावण्यात आले होते, तर तिसरा ट्रक कागदपत्र देवाण-घेवाणीच्या प्रकरणात कवठेमहांकाळ पोलिसांनी हरोली येथून पोलीस ठाण्याच्या आवारात आणला होता.
शनिवारी पहाटे पोलीस ठाण्याच्या आवारात कोणीही नसल्याचे पाहून अज्ञातांनी तीनही ट्रकच्या केबिनवर अग्निजन्य द्रव्य टाकून ते पेटवून दिले. केवळ वीस फुटांच्या अंतरावर असलेल्या पोलीस ठाण्यातील कोणालाही हा प्रकार समजला नाही. आग भडकल्यानंतर दोघे पोलीस बाहेर आले. त्यांनी लगेच तासगावच्या अग्निशामक दलाशी संपर्क साधला. अग्निशमक दलाच्या गाड्या आल्या. मात्र, तोपर्यंत केबिन पेटल्या होत्या. अग्निशमक दलाने आग आटोक्यात आणली. या आगीत इचलकरंजीचे नाना गायकवाड ( केए २२ बी ११६२) व सांगलीचे प्रकाश राठोड (एमएच १० डी ३४६९) यांचे वाळूचे ट्रक तसेच मालकी हक्कावरून वाद असलेला ट्रक ( एमएच ११ ए. एल. ६६७६) जळून खाक झाले .
पहाटे लागलेल्या आगीमुळे शहरात एकच खळबळ उडाली. घटनास्थळापासून जवळच पोलीस ठाणे, पोलिसांचे निवासस्थान, धान्याचे गोदाम, मागासवर्गीय विद्यार्थी वसतिगृह, भूमिअभिलेख कार्यालय, मंगल कार्यालये तसेच पश्चिमेला पंचायत समिती, उत्तरेला कोषागार कार्यालय अशी कार्यालये आहेत. गजबजलेल्या या भागातच ट्रक पेटवून दिल्याने बघ्यांनी गर्दी केली होती.
पोलीस ठाण्याच्या आवारात वाळूने भरलेले अनेक ट्रक लावलेले आहेत. शिवाय अपघातातील वाहनेही याच ठिकाणी लावण्यात आली आहेत. या वाहनांना आग लागली असती, तर मोठा अनर्थ घडला असता.
या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून, हवालदार प्रकाश चौगुले पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: Three trucks outside the police station were lit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.