तीन हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर!

By Admin | Updated: June 15, 2016 00:03 IST2016-06-14T22:59:43+5:302016-06-15T00:03:18+5:30

सांगलीतील घटना : टँकरला गळती; वीज पुरवठ्यासह वाहतूक बंद

Three thousand liter petrol on the road! | तीन हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर!

तीन हजार लिटर पेट्रोल रस्त्यावर!

सांगली : पेट्रोलने भरलेल्या एका टँकरला अचानक गळती लागल्याने सुमारे तीन हजार पेट्रोल रस्त्यावर सांडले गेले. येथील बायपास रस्त्यावर मंगळवारी सायंकाळी ही घटना घडली. महापालिकेच्या अग्निशमन दलाने तातडीने धाव घेतल्याने पुढील अनर्थ टळला. प्रसंगाधान ओळखून बायपास मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती. तसेच वीज पुरवठाही बंद केला होता. रात्री साडेआठ वाजता राहिलेले पेट्रोल दुसऱ्या टँकरमध्ये भरल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
मिरजेतील इंधन डेपोत रविवारी दुपारी ट्रँकरमध्ये (क्र. एमएच ०९ बीसी ४१४९) पेट्रोल भरण्यात आले होते. त्यानंतर हा टँकर वांगी (ता. कडेगाव) येथील पेट्रोल पंपावर पुरवठा करण्यासाठी निघाला होता. इस्लामपूर बायपास रस्त्यावर आल्यानंतर चालकाला पेट्रोलची गळती सुरू असल्याचे लक्षात आले. त्याने तातडीने टँकर रस्याकडेला घेतला. या घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या दोन गाड्या दाखल झाल्या. अग्निशमन अधिकारी शिवाजीराव दुधाळ, शहर पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलिस निरीक्षक दादासाहेब चुडाप्पा हेही दाखल झाले. पहिल्यांदा बायपास मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली. टँकरमध्ये १५ हजार लिटर पेट्रोल होते. यातील तीन हजार लिटरच्या कप्प्याला गळती लागली होती.
अग्निशनच्या जवानांनी गळती बंद होते का, यासाठी प्रयत्न केले, पण गळती सुरूच राहिली. त्यामुळे मिरजेतील इंधन डेपोत संपर्क साधून मोकळा टँकर (क्र. एमएच १० झेड ३८०५) बोलावून घेण्यात आला. या टँकरमध्ये सर्व पेट्रोल भरण्यात आले. दीड तास ही प्रक्रिया सुरू होती. साडेआठ वाजता पेट्रोलने भरलेला टँकर वांगीकडे रवाना करण्यात आला. अग्निशमनच्या जवानांनी पाणी मारून रस्ता स्वच्छ करून घेतला. (प्रतिनिधी)

अनर्थ टळला
चालकाने प्रसंगाधान ओळखून तातडीने टँकर थांबवला. अग्निशमन विभाग व पोलिस यंत्रणा तातडीने घटनास्थळी दाखल झाली. तातडीने उपाययोजना राबविल्याने पुढील अनर्थ टळला. यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

Web Title: Three thousand liter petrol on the road!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.