मसुचीवाडीप्रकरणी तिघांना उद्यापर्यंत कोठडी
By Admin | Updated: May 10, 2016 02:31 IST2016-05-10T01:59:50+5:302016-05-10T02:31:30+5:30
बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा

मसुचीवाडीप्रकरणी तिघांना उद्यापर्यंत कोठडी
इस्लामपूर : मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शालेय मुलींचा विनयभंग आणि छेडछाड करणाऱ्या बोरगावच्या तिघा आरोपींना येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाच्या दुसऱ्या जिल्हा न्यायाधीश श्रीमती कमल होरे यांनी उद्या, बुधवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. रोहित ऊर्फ इंद्रजित प्रकाश खोत (वय २१), सागर प्रकाश खोत (२३), अमोसिद्ध ऊर्फ आप्पासाहेब नरसाप्पा बबलेश्वर (वय २३, तिघे रा. बोरगाव) अशी पोलिस कोठडी मिळालेल्या आरोपींची नावे आहेत. यातील राजेंद्र विठ्ठल पवार-तपकिरे (३५) हा फरार आहे.
यावेळी न्या. श्रीमती होरे यांच्यासमोर सरकार पक्षाने यातील मुख्य संशयित आरोपी राजेंद्र पवार हा फरार असून, याच्या आश्रयाची माहिती अटकेतील तिघांकडे असण्याची शक्यता असल्याने पवारच्या शोधासाठी त्यांची चौकशी करावयाची आहे. तसेच गुन्हा करतेवेळी त्यांनी वापरलेल्या मोटारसायकली जप्त करावयाच्या आहेत. अल्पवयीन मुलींना शारीरिक (पान ८ वर)
बाल लैंगिक अत्याचार कायद्याखाली गुन्हा
दुधारीत युवतीचा विनयभंग; संशयिताची धुलाई
मसुचीवाडी (ता. वाळवा) येथील शालेय मुलींचे छेडछाड प्रकरण राज्यभर गाजत असतानाच, बोरगावमधील एका महाविद्यालयात शिकणाऱ्या २१ वर्षीय युवतीचा दुधारी येथे एकाने विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली. घटनेनंतर तो पळून जात असताना मुलीच्या नातेवाइकांनी त्याला पकडून चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले. सोमवारी सकाळी ११ वाजता हा प्रकार घडला.
याप्रकरणी पीडित युवतीने पोलिसांत फिर्याद दिली आहे. संशयित अल्पवयीन असल्याने त्याला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. युवती ही दुधारी (ता. वाळवा) येथे राहणारी आहे. सोमवारी सकाळी ११ वाजता ही युवती घरी एकटीच स्वयंपाक करीत होती. त्यावेळी अनोळखी युवक पाठीमागील दाराजवळ आला. त्याने तिच्याकडे पिण्यासाठी पाणी मागितले.
युवतीने त्याला पाणी दिले. ‘तू घरी एकटीच आहेस का? तुझा मोबाईल नंबर दे. आपण एकांतात बोलू’,असे तो म्हणाला. युवतीने त्याला तेथून निघून जाण्याविषयी बजावले. मात्र त्याने तिचा हात पकडला. युवतीने हाताला हिसडा मारुन शेजारी राहणाऱ्या चुलतीच्या घराकडे आरडाओरडा करीत पळ काढला. दरम्यान, शेतात पळून जाणाऱ्या संशयिताला शेजारील युवकांनी व नातेवाईकांनी पकडून चोप दिला व त्याला पोलिसांच्या स्वाधीन केले. फौजदार विराज जगदाळे अधिक तपास करीत आहेत.
खरे सूत्रधार खुलेआम
मसुचीवाडी येथील मुलींच्या छेडछाड प्रकरणावरून बोरगावातील फाळकूटदादा आमसिद्ध बबळेश्वर, सागर खोत व इंद्रजित खोत यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. परंतु यामागचे खरे सूत्रधार खुलेआम फिरत आहेत. -वृत्त हॅलो १