आणखी तीन राष्ट्रवादी नगरसेवक भाजपकडे

By Admin | Updated: September 13, 2015 00:18 IST2015-09-13T00:15:39+5:302015-09-13T00:18:24+5:30

तासगाव नगरपालिकेतील राजकारण : नगराध्यक्षांविरोधात सोमवारी अविश्वास ठराव दाखल होणार

Three more NCP corporators are from the BJP | आणखी तीन राष्ट्रवादी नगरसेवक भाजपकडे

आणखी तीन राष्ट्रवादी नगरसेवक भाजपकडे

तासगाव : तासगाव नगरपालिकेत भाजपने सुरू केलेले धक्कातंत्र सलग दुसऱ्या दिवशीही कायम ठेवले. राष्ट्रवादीच्या आणखी तीन नगरसेवकांसोबत खासदार संजयकाका पाटील यांच्याशी शुक्रवारी रात्री गोपनीय बैठक झाली. या नगरसेवकांनी नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी होकार दर्शविला आहे, तर नगरपालिकेत राष्ट्रवादीचा पुरता बोजवारा उडाला आहे. अविश्वास ठरावासाठी आवश्यक असणारी ‘मॅजिक फिगर’ मिळवण्यात भाजपला यश आले आहे. त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल करण्यात येणार असल्याचे भाजपकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
तासगाव नगरपालिकेतील गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादीअंतर्गत असलेली खदखद बाहेर पडली आहे. शुक्रवारी नगरसेविका सुशिला साळुंखे, विजया जामदार आणि रजनीगंधा लंगडे यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्याची बातमी बाहेर पडली. त्यामुळे शहरातील राजकीय वातावरण ढवळून निघाले. मात्र या तीन नगरसेवकांनी प्रवेश करुनदेखील भाजपला नगराध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी आणखी दोन नगरसेवकांशी आवश्यकता होती. शुक्रवारी दिवसभर खासदार समर्थक नगरसेवकांनी खलबते केली. रात्री विसापूर येथे उपगराध्यक्ष सुरेश थोरात, अनुराधा पाटील आणि शुभांगी साळुंखे यांची खासदार संजय पाटील यांच्यासोबत गोपनीय बैठक झाली. या बैठकीत अविश्वास ठरावाला पाठिंबा देण्यासाठी सहमती दर्शवली असल्याची चर्चा आहे. नगराध्यक्षांविरोधात खासदार गटाने १५ मतांची गोळाबेरीज करण्यात यश मिळवले आहे.
त्यामुळे सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठराव दाखल होणार असल्याचे निश्चित झाले आहे. (वार्ताहर)


 

Web Title: Three more NCP corporators are from the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.