जतमधील मोटरसायकल चोरट्यास तीन महिने शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2021 04:27 IST2021-02-24T04:27:57+5:302021-02-24T04:27:57+5:30
जत : जत शहर व परिसरात मोटरसायकलला डुप्लिकेट चावी वापरून मोटरसायकलची चोरी करून परस्पर विक्री करणारा सराईत गुन्हेगार नयन ...

जतमधील मोटरसायकल चोरट्यास तीन महिने शिक्षा
जत : जत शहर व परिसरात मोटरसायकलला डुप्लिकेट चावी वापरून मोटरसायकलची चोरी करून परस्पर विक्री करणारा सराईत गुन्हेगार नयन कांगनू कोल (वय २५, रा. फुलबारी जि. दक्षिण दिनाजपूर, पश्चिम बंगाल) याला तीन महिने शिक्षा देण्याचा आदेश जत येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. पाटील यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १० डिसेंबर २०२० रोजी आदिनाथ ज्ञानू लवटे (वय ३०, रा. उदनवाडी, ता. सांगोला जि. सोलापूर) यांची मोटरसायकल जत शहरातून चोरीस गेली होती. याप्रकरणी लवटे यांनी जत पोलिसात फिर्याद दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना नयन कोल हा संशयितरित्या जत शहरात फिरताना आढळून आला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे डुप्लिकेट चाव्या मिळाल्या. डुप्लिकेट चावी वापरून चोरलेल्या तीन मोटरसायकली त्याच्याकडे सापडल्या आहेत.
याप्रकरणी त्याच्याविरोधात जत पोलिसात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस कर्मचारी जे. एस. राणे यांनी केला होता. सरकारी वकील ॲड. जे. जे. पाटील यांनी न्यायालयातील काम पाहिले. न्यायालयाने आरोपीविरोधात असलेले सबळ पुरावे पाहून त्याला शिक्षेचा आदेश दिला आहे.