एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने तीन लाखांना गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:28 IST2021-02-16T04:28:58+5:302021-02-16T04:28:58+5:30
सांगली : शहरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत एकाने वृद्धाला दोन लाख ...

एटीएममधून पैसे काढण्याच्या बहाण्याने तीन लाखांना गंडा
सांगली : शहरातील गणपती मंदिराजवळ असलेल्या एटीएममधून पैसे काढून देण्याच्या बहाण्याने एटीएम कार्डची अदलाबदल करत एकाने वृद्धाला दोन लाख ८२ हजार रुपयांना गंडा घातला. याप्रकरणी रामचंद्र कृष्णा यादव (वय ७६, रा. गव्हाण, ता.तासगाव) यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दारूगोळा तयार करणाऱ्या कंपनीतून सेवानिवृत्त झालेले फिर्यादी रामचंद्र यादव गव्हाणचे रहिवाशी असून, त्यांचे निवृत्तिवेतन बॅंक खात्यावर जमा होत असते. ६ नोव्हेंबरला ते शहरातील गणपती मंदिरजवळ असलेल्या एटीएम सेंटरमधून पैसे काढण्यासाठी गेले होते. यावेळी तिथे आलेल्या एका तरुणास त्यांनी पैसे काढून देण्याची विनंती केली. यावर त्या तरुणाने एटीएम कार्ड बंद असल्याचे सांगून दुसरेच एटीएम कार्ड त्यांच्या हातात दिले होते. मात्र, हा प्रकार त्यांच्या लक्षात आला नाही.
त्यावेळी यादव यांनी बॅंकेतून १५ हजारांची रक्कम काढली होती. यानंतर अज्ञाताने वेळोवेळी एटीएम कार्डमधून दोन लाख ८२ हजार २५६ रुपयांची रक्कम काढून घेतली. यादव यांनी खात्याबाबत माहिती घेतल्यानंतर अज्ञाताने त्यांची रक्कम काढून घेतल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली आहे. यादव यांनी आज सकाळी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. शहर पोलिसात घटनेची नोंद असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
चाैकट
गेल्या आठवड्यातही सांगलीतील एकास वृद्धाला अशाच प्रकारे ४० हजार रुपयांना गंडा घालण्यात आला होता. शहरातील गर्दी असलेल्या ठिकाणी विशेषत: वृद्ध व्यक्तींचे एटीएम कार्ड बदलून असे प्रकार होत आहेत. त्यामुळे एटीएममध्ये व्यवहार करताना सावधानता बाळगण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.