तीन अल्पवयीन मुलींची सुटका
By Admin | Updated: May 10, 2015 00:48 IST2015-05-10T00:44:57+5:302015-05-10T00:48:34+5:30
सांगलीतील प्रेमनगरात छापा : दलाल महिलेस अटक

तीन अल्पवयीन मुलींची सुटका
सांगली : येथील काळ्या खणीजवळील प्रेमनगरमधील वेश्या वस्तीवर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने शुक्रवारी रात्री छापा टाकून तीन अल्पवयीन मुलींची सुटका केली. १४ ते १७ वयोगटातील या मुली आहेत. मुलींचा वेश्या व्यवसायासाठी वापर करणाऱ्या रूना कालामअली अन्सारी (वय ३२, रा. मुस्लिमपाडा, बाजबारीया, जिल्हा नोंदीया, राज्य पश्चिम बंगाल) या दलाल महिलेस अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
अन्सारी सहा महिन्यांपासून प्रेमनगरमध्ये वास्तव्यास आहे. तिने पश्चिम बंगालमधील तीन अल्पवयीन मुलींना येथे वेश्या व्यवसायासाठी आणले असल्याची माहिती मिळाली होती. गेल्या आठ दिवसांपासून पोलीस या वस्तीत जाऊन चौकशी करीत होते. त्यांना याठिकाणी मुली असल्याची खात्री पटताच शुक्रवारी रात्री छापा टाकण्यात आला. मुलींना ताब्यात घेऊन अन्सारीला अटक केली. तिच्याविरुद्ध अनैतिक मानवी व्यापारी प्रतिबंधक कायद्यांतर्गत विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. शनिवारी दुपारी तिला न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने ११ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या मुलींना तिने खरेदी करून आणले आहे की, अपहरण करून याचा तपास सुरू असल्याचे पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
मुली बालसुधारगृहात
ताब्यात घेतलेल्या तीन मुलींनाही न्यायालयात उभे केले होते. न्यायालयाने त्यांची बालसुधारगृहात रवानगी केली आहे. तत्पूर्वी पोलिसांनी मुलींची सांगलीच्या शासकीय रुग्णालयात वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये त्या अल्पवयीन असल्याचे स्पष्ट झाले आहे. या मुलींच्या नातेवाइकांशी पोलीस संपर्क साधून त्यांच्या वयाचे दाखलेही मागविणार असल्याचे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सांगितले.