सांगलीत साखळी चोरांच्या तीन टोळ्या सक्रिय

By Admin | Updated: June 22, 2014 00:29 IST2014-06-22T00:24:41+5:302014-06-22T00:29:35+5:30

पोलिसांची व्यूहरचना : गुन्ह्यांचे रेकॉर्ड वाढविण्याच्या हालचाली, कडक कारवाई होणार

Three gangs of Sangli Chan Chowk activated | सांगलीत साखळी चोरांच्या तीन टोळ्या सक्रिय

सांगलीत साखळी चोरांच्या तीन टोळ्या सक्रिय

सचिन लाड, सांगली : रस्त्यावरून फिरणाऱ्या एकट्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास करणाऱ्या दोन टोळ्या जेरबंद झाल्या असल्या, तरी आणखी तीन टोळ्या सक्रिय असल्याचे पोलिसांच्या चौकशीत निष्पन्न झाले आहे. या टोळ्यांना पकडण्यासाठी पोलिसांचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये त्यांना यशही येत आहे. त्यांच्याकडून पुन्हा असे गुन्हे होऊ नयेत, यासाठी त्यांच्याविरुद्ध चोरीसह जबरी चोरीचे गंभीर गुन्हे दाखल करुन रेकॉर्ड वाढविण्याची पोलिसांनी व्यूहरचना आखली आहे.
साखळी चोरी व घरफोडी हे दोन गंभीर गुन्हे सोडले, तर शहरात सध्या अन्य कोणत्याही गुन्हेगारी कारवाया सुरु नाहीत. सोलापूर, कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील गुन्हेगार तेथील पोलिसांच्या कारवाईचा ससेमीरा टाळण्यासाठी सांगलीत आश्रयाला येत आहेत. भाड्याने खोली घेऊन राहतात. स्थानिक तरुणांशी चांगली ओळख निर्माण करतात. त्यानंतर तरुणांना झटपट श्रीमंत होण्याचे आमिष दाखवून गुन्हेगारी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त करीत आहेत. पोलिसांनी सांगली, मिरजेत मुख्य रस्त्यावर सीसी टीव्ही कॅमेरे लावले आहेत. चोरट्यांना याची माहिती आहे. यामुळे ते मुख्य रस्त्यावर चोरी न करता उपनगरात जातात.
दोन ते तीन तास फिरुन ते एखादी महिला एकटी येत आहे का? तिच्या गळ्यात दागिने आहेत का? याची पाहणी करतात. त्यानंतर दागिने घेऊन अवघ्या एक-दोन मिनिटात पलायन करतात.
मोठी कारवाई होणार?
लूटमार करणाऱ्या सांगली व जत येथील दोन टोळ्यांना जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी दीड वर्षापूर्वी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण (मोक्का) कायद्यांतर्गत कारवाई केली. सध्या या टोळ्या कारागृहात आहेत. तेव्हापासून लूटमारीची एकही घटना घडली नाही. आता या कारवाईच्या धर्तीवरच सावंत यांनी साखळी चोरांविरुद्ध जास्तीत-जास्त गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल करून रेकॉर्ड वाढविण्याचे काम सुरू केले. त्यानंतर या चोरांवर मोक्का, तडीपार, झोपडपट्टीदादा यापैकी एखादी कारवाई होण्याची शक्यता आहे.
पेन्शन टोळीचे काय?
पेन्शन मंजूर करून देतो, मी पोलीस आहे, तुम्ही दागिने घालून फिरलात तर दोन हजार रुपये दंड होईल, असे सांगून मध्यम वयाच्या महिलांना गाठून त्यांचे दागिने लंपास करणारे भामटेही सक्रिय आहेत. असे गुन्हे सातत्याने नाही, मात्र अधून-मधून सातत्याने घडत आहेत. यातील एकाही गुन्ह्याचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले नाही.
चोरीतील दागिने सराफांनी विकत घेऊ नयेत, असे पोलीस नेहमी आवाहन करतात. सराफांनीही पोलिसांसोबत अनेकदा बैठक घेऊन चोरीतील दागिने विकत घेणार नाही, असे सांगितले आहे. मात्र तरीही सराफ चोरट्यांचे दागिने विकत घेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. सांगलीत पकडलेल्या साखळी चोरांनी २२ हजार रुपये तोळे या दराने सराफाला दागिने विकले. सराफाने चोरट्यांकडून ३२ तोळे दागिने घेऊन मोबदल्यात सात लाख रुपये दिले. चोरटे सापडल्यानंतर या सराफास विकत घेतलेले सर्व दागिने द्यावे लागले. या सराफाला १६ लाखांचा फटका बसला. दागिने विकायला येणाऱ्यांबाबत सराफांनी कळवावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Web Title: Three gangs of Sangli Chan Chowk activated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.