तीन माजी नगराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला
By Admin | Updated: November 9, 2016 00:56 IST2016-11-09T00:56:04+5:302016-11-09T00:56:04+5:30
विटा नगरपालिका निवडणूक : नऊ विद्यमान नगरसेवकही रिंगणात

तीन माजी नगराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला
दिलीप मोहिते ल्ल विटा
संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेल्या विटा नगरपरिषद निवडणुकीतील उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत अवघ्या दोन दिवसावर येऊन ठेपली असली तरी, प्रमुख लढत असलेल्या सत्ताधारी कॉँग्रेस व विरोधी शिवसेना पक्षांचे बहुतांशी उमेदवार निश्चित झाले आहेत. यावेळी विटा नगरपरिषद निवडणुकीच्या रिंंगणात तीन माजी नगराध्यक्षांसह तीन माजी उपनगराध्यक्षांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. यावेळी नऊ विद्यमान नगरसेवकांनीही निवडणुकीच्या मैदानात उतरून रणशिंग फुंकले आहे.
विटा नगरपरिषद निवडणुकीचे वातावरण सध्या तापू लागले आहे. पालिकेवर गेल्या अनेक वर्षांची असलेली सत्ता कायम ठेवण्यासाठी कॉँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष व माजी आ. सदाशिवराव पाटील आणि अशोकराव गायकवाड यांनी कंबर कसली असतानाच, विटा पालिकेत यावेळी सत्तांतर करण्यासाठी शिवसेनेचे विद्यमान आ. अनिल बाबर यांनी धनुष्यबाणाचा दोर ताणला आहे. त्यामुळे विटा पालिकेची निवडणूक आजी-माजी आमदारांच्या अस्मितेची बनली आहे.
या निवडणुकीत कॉँग्रेसचे उमेदवार नंदकुमार पाटील, सौ. मीनाक्षी पाटील व सौ. मनीषा शितोळे या तीन माजी नगराध्यक्षांसह कॉँग्रेसच्याच सौ. मालती कांबळे, सध्या शिवसेनेतून उमेदवारी दाखल केलेले शरद तुकाराम पवार व रमेश आत्माराम शितोळे या तीन माजी उपनगराध्यक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील प्रभाग क्र. २ ब मधून रिंंगणात उतरले असून त्यांना शिवसेना पक्षाचे अमोल बाबर यांनी आव्हान दिले आहे. तसेच सौ. मीनाक्षी सुखदेव पाटील या कॉँग्रेसच्या माजी नगराध्यक्षांचा सामना शिवसेनेच्या नीलम हणमंत पाटील यांच्याशी होत असून, प्रभाग क्र. ७ ब मध्ये माजी नगराध्यक्षा सौ. मनीषा सचिन शितोळे यांना, अपक्ष उमेदवार रेश्मा प्रवीण गायकवाड यांच्याशी झुंज द्यावी लागणार आहे.
या निवडणुकीत तीन माजी उपनगराध्यक्षही रिंंगणात आहेत. पूर्वी माजी आ. सदाशिवराव पाटील यांच्या सत्ताधारी गटातून उपनगराध्यक्ष पदावर संधी मिळालेले शरद तुकाराम पवार हे प्रभाग क्र. ४ ब मधून रिंंगणात उतरले असून, त्यांना कॉँग्रेसचे उमेदवार अरूण विष्णू गायकवाड यांच्याशी सामना करावा लागणार आहे. तसेच कॉँग्रेसच्या सौ. मालती कांबळे या प्रभाग क्र. ९ अ मधून निवडणूक लढवित असून, त्यांची शिवसेनेच्या गौरी कांबळे यांच्याशी लढत होत आहे. शिवसेनेचे उमेदवार व तत्कालीन सत्ताधारी गटाचे माजी उपनगराध्यक्ष रमेश शितोळे यांना प्रभाग क्र. १० ब मध्ये कॉँग्रेसचे उमेदवार दहावीर शितोळे यांनी आव्हान दिले आहे.
त्यामुळे या निवडणुकीत तीन माजी नगराध्यक्षांसह तीन माजी उपनगराध्यक्षांनीही रिंंगणात उतरून रणशिंग फुंकले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत दि. १० नोव्हेंबरपर्यंत आहे. ही मुदत अवघ्या दोन दिवसांनी संपणार असली तरी, प्रमुख लढत कॉँग्रेस विरूध्द शिवसेना पक्षातच होत आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षातील बहुतांशी उमेदवार निश्चित झाले आहेत. घरोघरी जाऊन प्रचाराला सुरूवात झाली आहे. त्यामुळे यावेळची निवडणूक अत्यंत चुरशीची व लक्षवेधी ठरण्याची शक्यता आहे.