महापालिकेतील तीन फायली गायब
By Admin | Updated: March 26, 2015 00:01 IST2015-03-25T23:23:44+5:302015-03-26T00:01:25+5:30
मध्यरात्रीचा प्रकार : कर्नाळ नाक्यावरील घटना

महापालिकेतील तीन फायली गायब
सांगली : महापालिकेच्या ड्रेनेज विभागाकडील चार फायली काल, मंगळवारी मध्यरात्री अडीचच्या सुमारास कर्नाळ नाका परिसरात पडल्या. या फायलींची बुधवारी दिवसभर शोधाशोध सुरू होती. त्यापैकी एक फाईल मिळाली असून अन्य फायली अद्यापही गायब आहेत. इतक्या मध्यरात्री या फायली घेऊन अधिकारी कुठे गेले होते, याचीच चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे.
पालिकेच्या मिरज विभागाकडील ड्रेनेज कामाच्या दोन लाखाच्या फायली मंजुरीच्या प्रतीक्षेत होत्या. मार्चपूर्वी या कामांची बिले काढण्यासाठी कर्मचाऱ्यांची घाईगडबड सुरू आहे. त्यातून दोन अधिकाऱ्यांनी मंगळवारी मध्यरात्री कामाचे बिल निश्चित करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याचे घर गाठले. रात्री अडीचपर्यंत या फायलींवर खलबते झाली. त्यानंतर त्या फायली घेऊन दोघेजण एका दुचाकीवरून आपापल्या घरी परतत होते. कर्नाळ नाका पोलीस चौकीपासून थोड्याच अंतरावर हे दोघे थांबले होते. त्यावेळी दुचाकीवरून फायली रस्त्यावर पडल्या, पण त्याचे भान या दोघांनाही राहिले नाही. एकमेकांकडे फायली असतील, अशी त्यांची सकाळपर्यंत समजूत होती. पण एकमेकांकडे चौकशी केल्यावर फायली नसल्याचे निदर्शनास येताच या अधिकाऱ्यांना घाम फुटला.
कर्नाळमधील एका युवकाला यातील एक फाईल सापडली होती. त्याने दूरध्वनी करून ती अधिकाऱ्यांकडे सुपूर्द केली. अजूनही तीन फायली व एक लखोटा गायब आहे. या अधिकाऱ्यांना फायली पडल्याचे भान न राहिल्याची उलट-सुलट चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. (प्रतिनिधी)
अधिकाऱ्यांची धावाधाव
मध्यरात्री कोठे-कोठे गेलो होतो, याचा विचार करीत ते दोघेजण कर्नाळ नाका परिसरात आले. तेथील रिक्षा, हातगाडी, गॅरेजवाल्यांना त्यांनी येथे फायली सापडल्या का?, अशी विचारणा केली. फायली सापडल्या, तर दूरध्वनीवरून कळवा, असा निरोप देऊन त्यांनी मोबाईल नंबर दिले. पण दुपारपर्यंत फायली न सापडल्याने पुन्हा या दोघांनी कर्नाळ नाका गाठून शोध घेतला.