‘कृष्णा व्हॅली’तून तिघांची हकालपट्टी
By Admin | Updated: December 29, 2014 23:37 IST2014-12-29T22:35:17+5:302014-12-29T23:37:49+5:30
नव्या निवडी : उपाध्यक्षपदी रमेश आरवाडे; पांडुरंग रूपनर सचिव

‘कृष्णा व्हॅली’तून तिघांची हकालपट्टी
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील कृष्णा व्हॅली चेंबर आॅफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज या संघटनेचे उपाध्यक्ष डी़ के. चौगुले, सचिव जफर खान आणि संचालक मनोज भोसले यांची संस्थेच्या मासिक सभेत हकालपट्टी करण्यात आली़ संस्थेच्या हिताविरोधात काम केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून, नूतन उपाध्यक्षपदी रमेश आरवाडे यांची, तर सचिवपदी पांडुरंग रूपनर यांची नव्याने निवड करण्यात आली आहे, अशी माहिती अध्यक्ष शिवाजी पाटील यांनी आज सोमवारी पत्रकार बैठकीत दिली़
पाटील म्हणाले की, माझ्या अध्यक्षपदाच्या कालावधित चेंबरची प्रतिमा उंचावेल असेच काम केले आहे़ माथाडीवर तोडगा काढण्यासह उद्योजकांच्या थकित अग्निशमन कराचा मुद्दा निकालात काढला आहे़ त्याच्या रकमा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत़ एमआयडीसीमधील उद्योजकांच्या विविध समस्यांचाही निपटारा करण्यात आला आहे़ रस्ते करणे हा एमआयडीसीचा विषय आहे़ त्यामुळे चेंबरने कोणतेही काम केले नसल्याचे विरोधकांचे म्हणणे चुकीचे आहे़ त्यांनी वारंवार संस्थेची बदनामी केल्यामुळेच त्यांना सर्वानुमते काढून टाकण्यात आले आहे़ याबरोबरच नव्याने निवडण्यात आलेले उपाध्यक्ष आरवाडे व सचिव रूपनर यांच्या निवडी कायदेशीर आहेत़
निवडीनंतर आरवाडे व रूपनर म्हणाले की, उद्योजकांना विश्वासात घेऊन त्यांचे प्रश्न सोडविण्याच्या गोष्टीला आम्ही प्राधान्य देणार आहोत़
यावेळी उद्योजक सतीश मालू, चंद्रकांत पाटील, दीपक मर्दा, अनंत चिमड, रशीद मोमीन, रवींद्र कोंडूस्कर आदी संचालक उपस्थित होते़ (वार्ताहर)