वाटमारीचे तीन गुन्हे उघडकीस
By Admin | Updated: October 8, 2015 01:09 IST2015-10-07T00:07:34+5:302015-10-08T01:09:43+5:30
एकास अटक : तिघे फरारी; कारागृहात तयार झाली टोळी

वाटमारीचे तीन गुन्हे उघडकीस
सांगली : गेल्या महिन्यात सांगली ग्रामीण, मिरज ग्रामीण व कुपवाड पोलीस ठाण्याच्या हद्दीत एकाच रात्रीत झालेल्या वाटमारीच्या तीन गुन्ह्यांचा छडा लावण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागास मंगळवारी यश आले. टोळीतील अजित ऊर्फ छोट्या अशोक कोळी (वय २४, लक्ष्मीनगर, नरवाड, ता. मिरज) यास अटक केली आहे. त्याचे तीन साथीदार फरारी आहेत. सहा महिन्यांपूर्वी हे चौघेही सांगलीच्या कारागृहात असताना त्यांची ओळख झाली. यातून त्यांनी नवीन टोळी करून हे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलीस निरीक्षक विश्वनाथ घनवट यांच्या पथकाने ही कारवाई केली. कारागृहातून जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांवर ‘वॉच’ ठेवण्याचे आदेश जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी यांनी दिले होते. त्यानुसार निरीक्षक घनवट यांच्या पथकाने गेल्या महिन्याभरात जामिनावर सुटलेल्या गुन्हेगारांची माहिती घेतली. त्यावेळी अजित कोळी जामिनावर बाहेर आला असल्याची माहिती मिळाली. त्याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद होता. या गुन्ह्यात तो कारागृहात होता.
मैत्रीनंतर गुन्ह्यांची मालिका
अजित कोळी याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत बलात्कार, वाटमारीचे, तर अनिल मानेविरुद्ध शहर पोलिसांत अमली पदार्थ बाळगणे, तसेच सिद्धेश्वर सोन्नुरे याच्याविरुद्ध जत, कवठेमहांकाळ पोलिसांत वाटमारीचे गुन्हे नोंद आहेत. विकास हजारे व गणेश या दोघांचे अद्याप रेकॉर्ड मिळाले नसल्याचे पोलीस निरीक्षक घनवट यांनी सांगितले. ते म्हणाले, हे चौघेही विविध गुन्ह्यांत सांगली जिल्हा कारागृहात एकाच बऱ्याकमध्ये होते. तिथे त्यांची चांगली ओळख झाली. त्याचे रूपांतर मैत्रीत झाले. त्यांनी एकमेकांचे मोबाईल क्रमांक घेतले होते. जामिनावर बाहेर आल्यानंतर ते संपर्क साधून एकत्रित आले अन् गुन्ह्यांची मालिकाच रचली.