पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:57 IST2021-09-02T04:57:22+5:302021-09-02T04:57:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तानंग फाटा येथे ...

पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या तिघांना अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : देशी बनावटीच्या शस्त्रास्त्रांची तस्करी करणाऱ्या तिघांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने तानंग फाटा येथे अटक केली. गौस ऊर्फ निहाल गफार मोमीन (वय २३, रा. आझाद कॉलनी, मिरज), सुरज विश्वास हत्तेकर (२९, रा. इंदिरानगर, सुभाषनगर) आणि तौफिक ख्वॉजा शेख (२१, रा. सैनिक वसाहत, इदगाहमाळ, मिरज) अशी संशयितांची नावे असून, त्यांच्याकडून तीन पिस्तुल, जिवंत काडतुसे व वाहन असा एकूण तीन लाख ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
बुधवारी एलसीबीचे पथक मिरज परिसरात गस्तीवर होते. त्यांना माहिती मिळाली की, तानंग फाटा येथे तिघेजण काळ्या रंगाच्या मोटारीतून शस्त्रास्त्र विक्रीसाठी येणार आहेत. त्यानुसार पथकाने नजर ठेवली. तेथे काळ्या रंगाच्या मोटारीतून तिघे येऊन थांबले. सहाय्यक निरीक्षक प्रशांत निशानदार यांनी तिघांना ताब्यात घेत चौकशी केली, पण त्यांनी कोणतीही माहिती दिली नाही. त्यामुळे त्यांची झडती घेतली. त्यात गौसकडे ५० हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तुल व दोन जिवंत काडतुसे, सुरजकडे ५० हजार रुपये किमतीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे आणि तौफीककडे ४० हजार रुपये किमतीचे पिस्तुल व जिवंत काडतुसे व गुन्ह्यात वापरलेली मोटार असा एकूण तीन लाख ४६ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पुढील तपासासाठी तिघांना मिरज ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुभाष सूर्यवंशी, सुधीर गोरे, अरुण औताडे, हेमंत ओसासे, चेतन महाजन, प्रशांत माळी यांच्या पथकाने ही कारवाई केली.