साडेतीन हजार गणेशमूर्ती जलकुंडात विसर्जित
By Admin | Updated: September 24, 2015 00:09 IST2015-09-23T22:09:54+5:302015-09-24T00:09:36+5:30
जल प्रदूषणास आळा : महापालिकेचा उपक्रम; मूर्ती दानाला गणेशभक्तांकडून प्रतिसाद --

साडेतीन हजार गणेशमूर्ती जलकुंडात विसर्जित
सांगली : जलप्रदूषण टाळण्यासाठी महापालिकेने जलकुंडात मूर्ती विसर्जित करण्याच्या उपक्रमास सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. विसर्जनाच्या पाचव्या दिवशी दोन हजार, तर बुधवारी सातव्या दिवशी दीड हजार अशा एकूण साडेतीन हजार मूर्ती भक्तांनी जलकुंडात विसर्जित करून जलप्रदूषण रोखले आहे. याशिवाय मूर्ती दान करण्यासाठी डॉल्फिन नेचर्स ग्रुप, कृष्णा व्हॅली रोटरी क्लब व कवठेपिरान (ता. मिरज) येथील ‘वन हार्ट बीट’ या पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थांनी मूर्ती दानचा उपक्रम हाती घेतला होता. पण त्यास थंडा प्रतिसाद मिळाला.
नदी व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी शहरात अनेक सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. प्रत्येकवर्षी या संस्था गणेशोत्सवात सरकारी घाटावर गणेश भक्तांचे निर्माल्य नदीत टाकू नका, मूर्ती जलकुंडात विसर्जित करावी किंवा ती दान करावी, याविषयी प्रबोधन करतात. याशिवाय महापालिकेचे कर्मचारीही यामध्ये सहभागी होतात. महापालिका क्षेत्रातील गव्हर्न्मेंट कॉलनी, नेमिनाथनगर, सरकारी घाट, विश्रामबाग, संजयनगर, सह्याद्रीनगर यासह दहा ठिकाणी मूर्ती विसर्जन करण्यासाठी जलकुंड ठेवले आहेत. पाचव्या दिवशी दोन हजार मूर्ती भक्तांनी जलकुंडात विसर्जित केल्या. सकाळी आठ ते रात्री बारा वाजेपर्यंत पालिकेचे कर्मचारी व पर्यावरणप्रेमी संस्थांचे सदस्य घाटावर उपस्थित होते. त्यांनी केलेल्या आवाहनाला भक्तांनी प्रतिसाद दिला. सुमारे दोन हजार मूर्ती जलकुंडात विसर्जित केल्या. सातव्या दिवशी घरगुती गणपतींचे विसर्जन कमी झाले. त्यामुळे केवळ दीड हजार मूर्ती जलकुंडात विसर्जित झाल्या. नवव्या दिवशीही हा उपक्रम राबविला जाणार आहे. मूर्ती दानविषयी गणेशभक्तांमध्ये फारशी जागृती झालेली नाही. दान करण्याचे आवाहन करूनही प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. काही भाविकांकडून मात्र मूर्तीचे दान केले जात आहे. (प्रतिनिधी)
पन्नास मूर्तींचे दान
डॉल्फिन नेचर्स ग्रुप, कृष्णा व्हॅली रोटरी क्लब व कवठेपिरान येथील वन हार्ट बीट यांनी भक्तांना मूर्ती दान करण्याचे आवाहन केले. त्यास अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पाचव्यादिवशी केवळ २५ भक्तांनी मूर्ती दान केल्या, तर सातव्यादिवशी ३० भक्तांनी मूर्ती दान केल्या. वन हार्ट बीटचे रामकृष्ण पाटील हे स्वत: मूर्ती स्वीकारत होते. कवठेपिरानमध्ये त्यांच्या मालकीचे गोदाम आहे. तिथे या मूर्ती जतन करून ठेवतात. पुढीलवर्षी या मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी देतात.