तासगावात साडेतीन कोटींचा दंड

By Admin | Updated: December 17, 2015 22:55 IST2015-12-17T22:44:15+5:302015-12-17T22:55:08+5:30

बेकायदा गौणखनिज प्रकरण : सात-बारावर बोजा चढविला

Three and a half million punishments | तासगावात साडेतीन कोटींचा दंड

तासगावात साडेतीन कोटींचा दंड

तासगाव : वाळू, मुरुमासह इतर गौणखनिजाचे बेकायदा उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर महसूल विभागाकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली होती. अशा दंड न भरणाऱ्या ९७ जणांच्या सात-बारावर तब्बल तीन कोटी ५२ लाख १३ हजार १८० रुपयांचा बोजा चढविण्यात आला असल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी गुरुवारी दिली. यापुढे बेकायदा गौणखनिजाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचे परवाने रद्द करण्याचे प्रस्ताव पाठविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
तासगाव तालुक्यात गौणखनिजाची बेकायदा वाहतूक आणि उत्खननासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. २०१४ पूर्वी बेकायदा वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्यांना दंडात्मक नोटिसा बजावण्यात आल्या होत्या. तरीदेखील नोटिसा न बजावणाऱ्या ९७ जणांच्या सात-बारावर बोजा चढविण्याचे आदेश संबंधित तलाठ्यांना दिले होते. त्यानुसार साडेतीन कोटींच्या बोजाची नोंद संबंधितांच्या सात-बारावर झाली असल्याची माहिती तहसीलदार भोसले यांनी दिली.
नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात २७ लाख ५१ हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली, तर वर्षभरात दंडात्मक कारवाई करुनही दंड न भरलेल्या आठजणांच्या सात-बारावर १७ लाख ४९ हजार २०० रुपयांचा बोजा नोंद करण्याचे आदेश तहसीलदारांना दिल्याची माहिती भोसले यांनी दिली. यापुढे तालुक्यात अवैध वाहतूक करणाऱ्या वाहनांची नोंदणी रद्द करण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडे प्रस्ताव पाठविण्यात येणार असून बेकायदा उत्खनन आणि वाहतूक होत असल्यास नागरिकांनी संपर्क साधावा, असे आवाहनही तहसीलदार भोसले यांनी केले. (वार्ताहर)

‘मोक्का’अंतर्गत प्रस्ताव देणार
बेकायदा गौणखनिजाविरोधातील मोहीम अधिक प्रभावीपणे सुरु करण्यात येणार आहे. चोरटी वाहतूक करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात येतील. शिवाय वारंवार वाहतूक आणि उत्खनन करणाऱ्यांविरोधात ‘मोक्का’अंतर्गत कारवाईचे प्रस्तावही पोलीस विभागाकडे सादर करण्यात येणार आहेत. अशा घटनांत कोणाचीही गय करण्यात येणार नाही, असे तहसीलदार सुधाकर भोसले म्हणाले.

Web Title: Three and a half million punishments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.