अशोक डोंबाळेसांगली : निसर्गाचा असमतोल, अवकाळी पाऊस, दुष्काळाच्या पार्श्वभूमीमुळे खरीप हंगामातील विविध पिकांचा विमा काढून संरक्षित करणे आवश्यक आहे. यासाठी ३१ जुलैपर्यंत मुदत असून, १५ जुलैपर्यंत जिल्ह्यातील सहा लाख खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनीच पीक विमा भरला आहे. उर्वरित शेतकऱ्यांना पीक विमा भरण्यासाठी फक्त १५ दिवस उरले आहेत. मात्र, यंदा पीक विमा भरण्यासाठी शासनाने फार्मर आयडीसह ई-पीक पाहणी अनिवार्य केली आहे. यामुळे खरीप हंगामातील साडेतीन लाख शेतकरी पीक विम्यापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात एकूण खातेदारांची सहा लाख संख्या असून, खरीप हंगामातील शेतकरी संख्या चार लाखापर्यंत आहे. २०२४च्या खरीप हंगामामध्ये ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभाग घेतला होता. चालू खरीप हंगामामध्ये १५ जुलै २०२५पर्यंत केवळ १९ हजार ८८१ शेतकऱ्यांनी १० हजार १९ हेक्टरचा पीक विमा उतरविला आहे. यासाठी शेतकऱ्यांनी पीक विम्याचे १८ लाख २६ हजार ४८६.४८ रुपये विमा कंपनीकडे भरले आहेत.नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांना पीक विमा महत्त्वाचा आहे. शेतकऱ्यांना विविध पिकांचा विमा भरण्यासाठी ३१ जुलैची मुदत आहे. आता केवळ १५ दिवस शेतकऱ्यांना पीक विमा उतरविण्यासाठी कालावधी शिल्लक आहे. या कालावधीत साडेतीन लाख शेतकरी पीक विमा उतरविणार का? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. शासनाने फार्मर आयडीसह अनेक अटी लादल्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहण्याची भीती आहे.
पीक विमा उतरविलेल्या शेतकऱ्यांची संख्यातालुका - शेतकरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)
- आटपाडी - ९४६ ५३४.१५
- जत - १३५०९ / ७४१२.०१
- कडेगाव - २१९ / ६३.३७
- क.महांकाळ - ९८० / ४१५.०४
- खानापूर - ८९९ / ३४२.४३
- मिरज - ४०३ / २२१.९८
- पलूस - १३८ / ६८.७६
- शिराळा - १५४ / ३६.१९
- तासगाव - २३५६ / ८२५.५३
- वाळवा - २७७ / १००.३४
नैसर्गिक आणि बाजारातील दराचा असमतोल या दोन्ही कारणांमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहे. या शेतकऱ्यांना शासनाने १०० टक्के मोफत पीक विमा देण्याची गरज होती. पण, त्याकडे शासनाने दुर्लक्ष करून पैसे भरण्याची सक्ती केली आहे. तसेच फार्मर आयडीही अनेक शेतकऱ्यांकडे नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी पीक विमा उतरण्याकडे दुर्लक्ष केले आहे. - महेश खराडे, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी पक्ष, सांगली