सचिन अरुण चांदणे (रा. सांगोला), इनुस इलाही मुजावर (रा. सांगली) व विरेन उल्हास आवळे (रा. मिरज) या तीन रुग्णवाहिका चालकांनी ॲपेक्स केअर रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी कमिशनवर काम केल्याचे चाैकशीत निष्पन्न झाले आहे. डाॅ. जाधव याच्या कोविड रुग्णालयात रुग्ण नेण्यासाठी सांगली - मिरजेतील काही रुग्णवाहिकाचालक कमिशनवर काम करत असल्याचे पोलिसांच्या चाैकशीत स्पष्ट झाले हाेते. यापैकी काही रुग्णवाहिका चालकांना पोलीस ठाण्यात पाचारण करून चौकशी करण्यात आली. चौकशीत या तिघांनी रुग्ण आणण्यासाठी कमिशन घेतल्याचे कबूल केल्याने त्यांना गांधी चौक पोलिसांनी मंगळवारी रात्री उशिरा अटक केली.
रुग्णालयात ८७ रुग्णांच्या मृत्यूप्रकरणी रुग्णालय चालक डाॅ. महेश जाधव याच्याविरूद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून पोलिसांनी डाॅ. महेश व त्याचा भाऊ डॉ. मदन जाधव यांच्यासह १० जणांना यापूर्वीच अटक केली आहे. रुग्णालयात मृत रुग्णांच्या १७ नातेवाईकांनी डाॅ. जाधव याच्याविरूद्ध उपचारात हलगर्जीपणा केल्याची व जादा बिले घेतल्याची तक्रार दिली आहे.
अॅपेक्सप्रकरणी पोलिसांच्या अटकसत्रामुळे सांगली-मिरजेतील वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
चाैकट
आज न्यायालयात हजर करणार
डॉ. महेश जाधव बारा दिवस पोलीस कोठडीत असून, बुधवारी पोलीस कोठडी संपत असल्याने बुधवारी त्यास मिरज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. रुग्णांच्या उपचाराची खोटी कागदपत्रे तयार करण्यासाठी मदत केल्याचे पोलिसांच्या चाैकशीत निष्पन्न झाल्याने त्याचा भाऊ मेंदू शस्त्रक्रियातज्ज्ञ डॉ. मदन जाधव हासुद्धा कोठडीत आहे. त्याची पाेलीस कोठडी वाढविण्याची मागणी पोलीस न्यायालयाकडे करणार आहेत.