जिल्हा बँक घोटाळ्याचे आरोप तिघांनी फेटाळले
By Admin | Updated: September 24, 2015 23:55 IST2015-09-24T22:35:52+5:302015-09-24T23:55:39+5:30
म्हणणे सादर : १३ रोजी सुनावणी

जिल्हा बँक घोटाळ्याचे आरोप तिघांनी फेटाळले
सांगली : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील ४ कोटी १८ लाख रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी अधिकारी तथा जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी ७० जणांवर आरोपपत्र दाखल केले आहे. यावर गुरुवारी सुनावणी झाली. सुनावणीला पाच संचालकांसह नऊ वारसदार असे चौदाजण गैरहजर होते. एका संचालकासह दोन वारसांनी घोटाळ्याचे आरोप फेटाळले. उर्वरित ५३ जणांनी मुदतवाढीची मागणी केली असून, पुढील सुनावणी १३ आॅक्टोबर रोजी होणार आहे. २००१-०२ ते २०११-१२ या कालावधीतील जिल्हा बँकेच्या प्रधान कार्यालयाचे रंगकाम व दुरुस्ती, अमृतमहोत्सवी कार्यक्रमातील खर्च, नोकरभरती, इमारत बांधकामासाठी केलेला खर्च, बँक गॅरंटी शुल्क परत देण्याचा व्यवहार, बचत गट संघास दिलेले मानधन, निवृत्त अधिकाऱ्यांवर केलेला पगाराचा खर्च, अशा अनेक नियमबाह्य गोष्टी निदर्शनास आल्या होत्या. याप्रकरणी जिल्हा विशेष लेखापरीक्षक श्रीधर कोल्हापुरे यांनी चार कोटी १८ लाख रुपयांच्या गैरव्यवहाराची जबाबदारी ७० जणांवर निश्चित केले आहेत.
या आरोपावर गुरुवारी कोल्हापुरे यांच्यासमोर सुनावणी झाली. संचालक बी. के. पाटील व मृत रामचंद्र खराडे यांच्या दोन वारसदारांनी या घोटाळ्यात आमचा सहभाग नसल्याचे सांगत आरोप फेटाळून लावले; तर ५३ जणांनी म्हणणे सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी केली. (प्रतिनिधी)