सांगलीत सौद्यामध्ये हजार टन बेदाण्याची आवक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:18 IST2021-06-10T04:18:19+5:302021-06-10T04:18:19+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : सांगली मार्केट यार्डमध्ये बेदाणा सौद्यासाठी शंभर गाड्यांमधून हजार टन बेदाण्याची आवक झाली. चांगल्या प्रतिच्या ...

सांगलीत सौद्यामध्ये हजार टन बेदाण्याची आवक
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगली मार्केट यार्डमध्ये बेदाणा सौद्यासाठी शंभर गाड्यांमधून हजार टन बेदाण्याची आवक झाली. चांगल्या प्रतिच्या हिरव्या बेदाण्याला प्रतिकिलो २१० रुपये दर मिळाला. बेदाणा सौदे सुरळीत चालू झाल्यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
सांगली मार्केट यार्डात बुधवारी बाजार समितीचे सभापती दिनकर पाटील, सचिव महेश चव्हाण यांच्या उपस्थितीत बेदाणा सौद्याला सुरुवात झाली. कोरोनामध्ये कडक लॉकडाऊन लावल्यानंतर बेदाण्याचा दुसराच सौदा बुधवारी निघाला. शेतकऱ्यांची खरीप हंगामातील मशागती, पेरणीसाठी धावपळ सुरु आहे. द्राक्षबागांची छाटी झाल्यामुळे रासायनिक खते, कीटकनाशक औषधासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज आहे. बेदाणा हंगाम सुरु झाल्यानंतर मार्चमध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे शेतकऱ्यांकडील बेदाण्याची विक्रीच झाली नाही. यामुळे बेदाण्याचे सौदे सुरु होणे शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाचे होते. बुधवारी झालेल्या सौद्यात ३५ अडत दुकानांमध्ये शंभर गाड्यांमधून हजार टन बेदाण्याची आवक झाली होती. चांगल्या प्रतिच्या हिरव्या बेदाण्याला २१० रुपये प्रतिकिलो दर मिळाला आहे. हिरव्या बेदाण्याला सरासरी प्रतिकिलो १५० ते २१० रुपये दर होता. मध्यम बेदाण्याला प्रतिकिलो १२० ते १७० रुपये, काळ्या बेदाण्याला ४० ते ६० रुपये किलो असा भाव मिळाला. पिवळ्या बेदाण्याला प्रतिकिलो १८० ते २०० रुपये दर मिळाल्याचे बाजार समितीचे सचिव महेश चव्हाण यांनी सांगितले.
चाैकट
बुधवार, शुक्रवारी सौदे निघणार
बेदाण्याला योग्य दर मिळावा आणि उलाढाल वाढण्यासाठी बुधवारी, शुक्रवारी बेदाण्याचे सौदे होणार आहेत. जिल्हाधिकारी यांनी घालून दिलेल्या आदेशाचे पालन करुन सौदे काढले जात आहेत. सकाळी १० ते दुपारी ४ यावेळेत बेदाणा सौदे निघणार आहेत, अशी माहिती बेदाणा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र कुंभार व मनोज मालू यांनी दिली.