सांगलीत अतिरिक्त पदभारामुळे दमछाक
By Admin | Updated: September 7, 2014 23:26 IST2014-09-07T21:51:37+5:302014-09-07T23:26:25+5:30
महापालिकेची स्थिती : अधिकाऱ्यांकडे जादा पदभार

सांगलीत अतिरिक्त पदभारामुळे दमछाक
सांगली : महापालिकेच्या कारभाराची दोरी सध्या प्रभारी अधिकाऱ्यांकडे आहे. एकाच अधिकाऱ्याकडे अनेक विभागांचा पदभार आहे. या अतिरिक्त पदभारामुळे पालिकेच्या कारभाराच्या ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ झाल्या असून, एकेका विभागाला न्याय देईपर्यंत अधिकाऱ्यांची दमछाक होत आहे.
पालिकेत पाच वर्षापूर्वी विकास महाआघाडी सत्तेवर आल्यानंतर सर्वच विभागात प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांचा भरणा झाला होता. प्रतिनियुक्तीवरील अधिकाऱ्यांना परत पाठवा, यासाठी आंदोलनेही झाली. पालिकेच्या आस्थापनेवरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना पदोन्नती न देता शासनाकडून अधिकारी मागविल्याची ओरड झाली. प्रतिनियुक्तीवरील काही अधिकाऱ्यांनी पालिकेला चांगली शिस्त लावली, तर काहींनी केवळ तीन वर्षे कामचलावू कामगिरी केली. पालिकेत सत्ताबदल होण्यापूर्वी
आणि सत्ताबदल झाल्यानंतर त्यापैकी काही अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या.
त्यात प्रामुख्याने शहर अभियंता, पाणीपुरवठाचे कार्यकारी अभियंता, नगररचनाचे सहाय्यक संचालक, आरोग्यचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी या महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. या पदांवर आता नव्याने काही अधिकारी दाखल झाले आहेत, तर काही पदे अजूनही रिक्त आहेत. वैद्यकीय आरोग्य अधिकारी म्हणून डॉ. सुनील आंबोळेंकडे पदभार आहे. त्यांच्यावर लाच घेतल्याचा आरोप असून, याप्रकरणी ते निलंबित होते. पण निलंबनाचा कार्यकाल पूर्ण झाल्यानंतर पुन्हा त्यांच्याकडे आरोग्यचा पदभार देण्यात आला आहे. आरोग्यकडील वैद्यकीय विभाग डॉ. रोहिणी कुलकर्णी सांभाळतात. नगरसचिवपदी चंद्रकांत आडके यांची नियुक्ती केली होती. आता नगरसचिव पदासह त्यांच्याकडे आयुक्तांचे स्वीय सहाय्यक म्हणूनही जबाबदारी आहे. रमेश वाघमारे यांच्याकडे मालमत्ता व्यवस्थापक, सहाय्यक आयुक्त, तर नव्यानेच महापालिका सेवेत दाखल झालेले डॉ. प्रशांत रसाळ यांच्याकडे मिरजेच्या उपायुक्तपदाचा व अतिक्रमण विभागाचा पदभार आहे. कुपवाडचे सहाय्यक आयुक्त सुनील नाईक यांना त्यांच्या पदासह लेखापालाचीही जबाबदारी पार पाडावी लागते. तीच स्थिती उपायुक्त ओमप्रकाश दिवटे यांचीही आहे. त्यांच्याकडे मुख्य लेखापरीक्षकाचा पदभार असतो.
पालिकेतील अनेक अधिकाऱ्यांकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्याशिवाय सेवेतील अधिकारी दीर्घ रजेवर गेल्यास त्यांचा पदभार कोणत्या ना कोणत्या अधिकाऱ्याला सांभाळावा लागतोच. कामाच्या अतिरिक्त ताणामुळे अधिकाऱ्यांना एकाच विभागाला न्याय देता येत नाही. (प्रतिनिधी)
अधिकारी व पदे
ओमप्रकाश दिवटे : उपायुक्त सांगली, मुख्य लेखापरीक्षक
प्रशांत रसाळ : उपायुक्त मिरज, मुख्य लेखापाल, अतिक्रमण
एस. जी. मुजावर : एलबीटी अधीक्षक, विधी विभागप्रमुख
टीना गवळी : सहाय्यक आयुक्त, मिरज व कुपवाड
रमेश वाघमारे : सहाय्यक आयुक्त सांगली, मालमत्ता व्यवस्थापक, प्रशासन अधिकारी
चंद्रकांत आडके : नगरसचिव, जनसंपर्क अधिकारी, आयुक्तांचे स्वीय सहाय्यक