संगणक वाहन परवान्यामुळे हजारो अनुत्तीर्ण
By Admin | Updated: May 7, 2015 00:33 IST2015-05-07T00:24:10+5:302015-05-07T00:33:48+5:30
जिल्ह्यातील स्थिती : वाहतूक नियमांचे अज्ञान; वर्षभरात ७३४१ परीक्षार्थी उत्तीर्ण

संगणक वाहन परवान्यामुळे हजारो अनुत्तीर्ण
सांगली : वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) घेण्यासाठी संगणकावर परीक्षा देण्याची सक्ती करण्यात आली असली, तरी त्यास कमी प्रतिसाद असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षभरात संगणकावर परीक्षा देऊन केवळ ७३४१ उमेदवार वाहन चालविण्यास पात्र ठरले आहेत. वाहतूक नियमांविषयी अजूनही वाहनधारकांत अज्ञानपणा असल्याचे दिसून येते. यामुळेच अनुत्तीर्णांच्या प्रमाणात घट झालेली नाही. सध्या हे प्रमाण २७ टक्के असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ वाघुले यांनी सांगितले.
पूर्वी मोटार वाहन निरीक्षकांकडून वाहतूक नियमांविषयी प्रश्न विचारले जायचे. ही तोंडी परीक्षा व्हायची. प्रत्येक वाहनधारक यात उत्तीर्ण व्हायचा. पुढे पक्के लायसन्स काढताना वाहनाची फेरी मारली की, लायसन्स काढण्याची प्रक्रिया पूर्ण व्हायची. यामध्ये यंत्रणेतील अनेक त्रुटी समोर आल्याने गेल्या दोन वर्षापासून लायसन्स काढण्याची जुनी पद्धत बंद करण्यात आली. कच्चे लायसन्स काढण्यासाठी प्रथम आॅनलाईन बुकिंग करण्याचा नियम करण्यात आला. तारीख मिळेल त्यादिवशी वाहनधारकाने जायचे. संगणकावर १५ गुणांची परीक्षा ठेवण्यात आली आहे. वाहतूक नियमांविषयी १५ प्रश्न विचारले जातात. प्रत्येक प्रश्नाला तीन पर्यायी उत्तरे दिलेली असतात. जे उत्तर बरोबर आहे, त्यावर केवळ अधोरेखित करायचे आहे. परीक्षा झाली की वाहनधारकास खुर्चीवरून उठण्यापूर्वीच तो उत्तीर्ण झाला आहे की अनुत्तीर्ण, हे समजते. ही अत्यंत व सोपी प्रक्रिया आहे.
परीक्षेला एकावेळी १५ वाहनधारकांना बसण्याची सोय केली आहे. दररोज ५० ते ६० उमेदवार परीक्षेला येतात. यातील १३ ते १४ टक्के उमेदवार उत्तीर्ण होतात. कधी-कधी उत्तीर्णची ही टक्केवारी चार ते पाच टक्क्यावर येते. अनेकदा जेवढे उमेदवार दिवसभरात परीक्षेला बसले होते, ते सर्व अनुत्तीर्ण झाले आहेत.
गेल्या वर्षभरात ९९९७ वाहनधारक परीक्षेला बसले होते. यातील ७३४१ उत्तीर्ण, तर २६५६ अनुत्तीर्ण झाले आहेत. वाहतूक नियम काय असतात, हे अनेकांना माहीतच नसल्याचे परीक्षेवेळी दिसून आले आहे. यामुळे अनुत्तीर्ण होण्याचे प्रमाण जास्त आहे. (प्रतिनिधी)
वाहने लाखावर... लायसन्स हजारो
महिन्याला तसेच सणासुदीला लाखो वाहने रस्त्यावर येतात. या वाहनांची नोंदणीही होते. मात्र वाहन चालविण्याचा परवाना (लायसन्स) काढण्यासाठी हे वाहनधारक का पुढे येत नाहीत. वर्षभरात ९९९७ जणांनी लायसन्ससाठी परीक्षा दिली; पण या तुलेनत लाखो वाहने रस्त्यावर आली आहे. वाहन विक्रीच्या तुलनेत लायसन्स काढण्याची लोकांमध्ये अजूनही मानकिसता दिसत नाही. पोलीस ज्यादिवशी नाकाबंदी करतात, त्यावेळी शंभरहून अधिक वाहनचालक लायसन्स नसणारे सापडतात.