खुजगावात हजारो एकर शेती क्षारपड

By Admin | Updated: April 10, 2015 23:49 IST2015-04-10T22:56:50+5:302015-04-10T23:49:06+5:30

पिकांचेही मोठे नुकसान : वारणा डाव्या कालव्याच्या गळतीचा परिणाम

Thousands of acres of agricultural land in Khajjgaon | खुजगावात हजारो एकर शेती क्षारपड

खुजगावात हजारो एकर शेती क्षारपड

येळापूर : खुजगाव (ता. शिराळा) येथे वारणा डाव्या कालव्यानजीक वारंवार होणारी गळती व त्यातून वाया जाणारे पाणी यामुळे भागातील पिकांच्या नुकसानीबरोबरच जमिनी क्षारपड होऊ लागल्या आहेत. यामुळे शेतकरी वर्गातून चिंता व्यक्त केली जात आहे.
चांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यातून उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या जमिनीसाठी आणि पिण्याच्या पाण्याच्या समस्येला धरून वारंवार पाणी सोडले जाते. मात्र या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते. त्यातच अंतर्गत करण्यात आलेले अस्तरीकरण, काँक्रिटीकरण निकृष्ट दर्जाचे बनले आहे.
जागोजागी बसविण्यात आलेले रबर खराब झाल्याने यातूनही पाण्याची गळती होत आहे. या सततच्या गळतीमुळे शेतकऱ्यांची पिके वाया जात आहेत. जमिनी क्षारपड होत चालल्या आहेत. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात असल्याने त्याचाही उपयोग होत नाही. जिल्ह्यात पाण्यासाठी वणवण हिंडावे लागत आहे. दुसरीकडे अति पाण्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
याबाबत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विकास देशमुख म्हणाले की, डाव्या कालव्याची गळती काढावी, नव्याने सर्वेक्षण करावे, याबाबत सदाभाऊ खोत यांनी बैठकही घेतली होती. मात्र तत्कालीन सरकारने याची दखल घेतली नाही. नव्या सरकारने तरी याबाबत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा. (वार्ताहर)

लाखो लिटर पाणी वाया
चांदोली धरणापासून २६ कि.मी.पर्यंत वारणा डाव्या कालव्याचा विस्तार झाला आहे. या कालव्यास आरळा, चरण, मोहरे, नाठवडे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती असल्याने बरेचसे पाणी पुढे न सरकता या परिसरातून गळतीद्वारे लाखो लिटर पाणी वाया जाते.

Web Title: Thousands of acres of agricultural land in Khajjgaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.