मराठमोळ्या लोकगीतांवर छोट्यांचा जल्लोष
By Admin | Updated: November 30, 2015 01:11 IST2015-11-30T00:17:40+5:302015-11-30T01:11:54+5:30
‘लोकमत’ बाल विकास मंचचा उपक्रम : ‘रंग मराठी मातीचा’ कार्यक्रमाने आणली रंगत

मराठमोळ्या लोकगीतांवर छोट्यांचा जल्लोष
सांगली : मराठमोळ्या अवीट लोकगीतांची होणारी बरसात... नृत्याविष्काराने चढविलेला सुंदर साज... छोट्यांसह पालकांनाही मराठी मातीच्या अस्सल गंधाने मोहीत करणारी जादू... अशा वातावरणात रविवारी सांगलीत ‘रंग मराठी मातीचा’ या कार्यक्रमाने धम्माल मनोरंजन केले. गीतांच्या तालावर ताल धरत बच्चे कंपनीने एकच जल्लोष केला.
‘लोकमत’ बाल विकास मंच आणि टायनी रोझेस इंग्लिश मिडीयम स्कूल (सीबीएसई) सांगली यांच्या संयुक्त विद्यमाने सांगली येथील विष्णुदास भावे नाट्यमंदिरात रविवारी ‘रंग मराठी मातीचा जय जय महाराष्ट्र माझा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी बालमंडळी व त्यांच्या पालकांनी मोठी गर्दी केली होती. कार्यक्रमाचे उद्घाटन टायनी रोझेस स्कूलचे सचिन जगदाळे त्यांच्या पत्नी स्नेहा जगदाळे यांच्याहस्ते दीपप्रज्ज्वलनाने करण्यात आले. यावेळी या शाळेचे शिक्षक विशाल देशपांडे, वीणा देशपांडे, उमा चव्हाण उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात गणेश वंदनेने झाली. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या या कार्यक्रमात भव्य-दिव्य शिवराज्याभिषेक सोहळा चिमुकल्यांना जिंकून गेला. शिवराज्याभिषेक सोहळ््याचा प्रसंग कलाकारांनी अत्यंत सुंदररित्या सादर केला. छत्रपती शिवरायांच्या आगमनाने आणि संवादाने बालकांची मने जिंकली. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठीचे नेपथ्यही अत्यंत प्रभावी होते.
त्यासोबतच दिंडी सोहळा, वासुदेव, शेतकरी राजा, धनगरगीत, कोळीगीत अशा अनेक लोकगीतांचा आणि नृत्याचा सहजसुंदर आविष्कार बालमंडळींना जिंकून गेला. ‘शांताबाई’ या गाण्यावर उपस्थित बालमंडळींनी एकच जल्लोष केला. या गाण्यावर एका कलाकाराने सुंदर नृत्य सादर केले. ‘मार्तंड मार्तंड मल्हार’, ‘दार उघड, दार उघड’ ‘माऊली माऊली’, ‘काठी अन् घोंगडं’ ‘वासुदेव आला’, ‘लग्नाला चला तुम्ही लग्नाला चला’, ‘सुंबरानं मांडलं’ अशा एकापेक्षा एक मराठमोळ्या लोकगीतांची बरसात भावे नाट्यमंदिरात सुरू होती. या वर्षावात भिजण्याचा मनसोक्त आनंद बालमंडळींनी लुटला. बरसणाऱ्या या गीतांमधूनच मराठी मातीचा दरवळ त्यांच्या मनाला स्पर्शून गेला. नाट्यगृहाबाहेर पडणाऱ्या चिमुकल्यांच्या मुखातून मराठमोळ्या गीतांचे गुणगुणनेही सुरू होते. लोकगीतांच्या जादुई दुनियेतून बाहेर पडल्यानंतरही बराच काळ त्यांच्यावर ही मोहिनी कायम होती. (प्रतिनिधी)
संयुक्त वाढदिवस...
छोट्यांच्या कौतुकांना जागा मिळावी, यासाठी बाल विकास मंचचा वर्षभर बालचमूंसाठी उपक्रम सुरू असतो. याचाच एक भाग म्हणून नोव्हेंबर महिन्यात येणाऱ्या बाल मंच सदस्यांचा वाढदिवस यावेळी एकत्रितपणे साजरा करण्यात आला. केक कापून वाढदिवसाचा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी उपस्थित बालमंडळींनी व पालकांनी टाळ्यांच्या कडकडाटात वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
विविध स्पर्धा : बक्षीस वितरण
दिवाळीत बालचमूंसाठी घेण्यात आलेल्या किल्ला स्पर्धेसोबतच ‘रंग दे’ चित्रकला स्पर्धा आणि एज्युकेशन स्पर्धा या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरणही कार्यक्रमामध्ये यावेळी करण्यात आले. सचिन जगदाळे, अमोल शिंदे, सागर सूर्यवंशी, अमित विभुते यांच्याहस्ते विजेत्यांना रोख रक्कम, स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
‘रंग मराठी मातीचा’च्या लोकगीतांमुळे कार्यक्रमात धमाल
कसबे डिग्रज येथील श्री संत ज्ञानेश्वर गणेशोत्सव मंडळाने ‘रंग मराठी मातीचा’ या कार्यक्रमाची निर्मिती केली आहे. सूरज सर्जेराव वाघमोडे यांचे नृत्य दिग्दर्शन, अनुजा नाट्यविश्व यांनी केलेली वेशभूषा कार्यक्रमातील रंगत वाढवून गेली. छोट्या मुलांचा अत्यंत सहज संवाद आणि कार्यक्रमाचे प्रा. संतोष जाधव यांनी केलेले निवेदनही प्रभावी होते.