गस्त घालणाऱ्यांनीच केली चोरी, वाटमारी
By Admin | Updated: July 30, 2015 00:22 IST2015-07-30T00:22:31+5:302015-07-30T00:22:52+5:30
इस्लामपुरात स्थानिक चोरटे जेरबंद : सहा गुन्हे उघडकीस

गस्त घालणाऱ्यांनीच केली चोरी, वाटमारी
इस्लामपूर : वाळवा, शिराळा तालुक्यांत चोरटे आल्याची अफवा उठवत तसेच रात्रगस्तीमध्ये सक्रिय राहत चोरी, वाटमारी करणाऱ्या स्थानिक चोरट्यांच्या टोळीला जेरबंद करण्यात इस्लामपूर पोलिसांना यश आले. या टोळीने कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांच्या हद्दीतील महामार्गावर लुटमारीचे थैमान घातले होते. टोळीने मोटारसायकल चोरीसह सहा वाटमारींच्या गुन्ह्यांची कबुली दिल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक वैशाली शिंदे यांनी दिली.
रोहित गुणवंत शेलार (वय २१, रा. पेठ) हा या टोळीचा सूत्रधार आहे. रोहित अशोक हुसमाने (१८, रा. कासेगाव) याच्यासह कासेगावमधील दोन अल्पवयीन चोरट्यांचा या टोळीत समावेश आहे. इतर चौघे फरार असून, त्यांनाही लवकरच पकडले जाईल, असे उपअधीक्षक शिंदे यांनी सांगितले. किणी टोलनाक्यापुढे झालेल्या वाटमारीची कबुलीही रोहित शेलार याने दिली आहे. या टोळीकडून पोलिसांनी चोरीच्या दोन मोटारसायकली व चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
वाळवा-शिराळा परिसरात गेल्या महिन्याभरापासून चोरट्यांच्या अफवा पसरविल्या जात होत्या. या टोळीला अटक करण्यात आल्यानंतर शेलार व हुसमाने या दोघांनी त्यांच्या चोरी, वाटमारी करण्याच्या पद्धतीची माहिती पोलिसांना दिली. त्यांची आठजणांची टोळी आहे. हे सर्वजण रात्रीच्या गस्तीमध्ये सहभागी असायचे. त्यांच्याकडून एखाद्या घरावर दगड फेकला जायचा. त्यामुळे गावात चोरट्यांची दहशत बसली होती. त्यातूनच हे सर्वजण मोबाईलद्वारे संपर्क साधून चोरी आणि वाटमारीचा बेत ठरवायचे. रोहित शेलार हा त्याचे नियोजन करायचा. ठरल्यानुसार सगळे पेठनाका परिसरात जमायचे आणि दोन मोटारसायकलीवरून महामार्गावर वाटमारी करायचे. महामार्गावर अंधारात मोटारसायकली लावून दोन्ही बाजूला चार-चारजण अंधारात दबा धरून बसायचे. रिक्षा, मोटारसायकल अशी वाहने आली की हे सर्वजण चाकू, दांडकी हातात घेऊन वाहनाच्या आडवे जायचे. वाहनधारकाला धाक दाखवून लुटायचे. मारहाण न करता त्याच्याकडील रोख रक्कम, दागिने, मोबाईल असा ऐवज काढून घेऊन तेथून पोबारा व्हायचे, अशी या टोळीची पद्धत होती.
मंगळवारी (दि. २८) सहायक पोलीस निरीक्षक व्ही. एल. राठोड, फौजदार विराज जगदाळे हे त्यांच्या पथकासह रात्रची गस्त करीत असताना पेठ उड्डाणपुलाच्या खालच्या रस्त्यावरील कोपऱ्यात रोहित शेलार, रोहित हुसमाने व इतर दोन अल्पवयीन असे चौघे संशयास्पदरीत्या पैशांची वाटणी करीत असताना निदर्शनास आले. त्यांना त्याचवेळी ताब्यात घेण्यात आले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्यांनी चोरीच्या, वाटमारीच्या घटनांची कबुली दिली. त्यांच्याकडून दोन मोटारसायकली, चाकू आणि दोन हजार १४० रुपयांची रोकड हस्तगत केली. या टोळीनेच किणी टोल नाका परिसरात ट्रक चालकाला लुबाडून पाच हजार ७०० रुपये पळविले होते. शिवपुरी खिंडीत मोटारसायकलस्वारास अडवून ५०० रुपये व मोबाईल, पेठ परिसरातील सह्याद्री धाब्याजवळ एकाची सोन्याची अंगठी, घरफोड्या, वाघवाडी फाटा, वाठार (कऱ्हाड) येथे वाटमाऱ्या केल्याची कबुली या टोळीने दिली आहे. हवालदार वसंत साळुंखे, बापू कांबळे, संदीप सावंत, वैभव पाटील यांनी या कारवाईत भाग घेतला. (वार्ताहर)
पोलीस कोठडीत रवानगी..!
चोरी आणि वाटमारी करणाऱ्या रोहित शेलार व रोहित हुसमाने या दोघांना बुधवारी येथील न्यायालयासमोर उभे करण्यात आले होते. न्यायालयाने दोघांना १ आॅगस्टपर्यंत चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले, तर यातील दोन अल्पवयीन चोरट्यांना सांगली येथील बाल गुन्हेगार विषयक न्यायाधीकरणासमोर हजर करण्यात आले. या टोळीविरुद्ध खुनाचा प्रयत्न, चोरी, वाटमारी, घरफोडी यासारख्या अनेक गुन्ह्यांंची नोंद सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांतील पोलिसांत आहे.