विटा : नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, लोकसभा, एवढेच नव्हे, तर गेल्या विधानसभा निवडणुकीवेळीही ज्यांनी पक्षाशी विसंगत भूमिका घेऊन काम केले, त्यांनी आम्हाला आता पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला खानापूर पंचायत समितीचे उपसभापती सुहास बाबर यांनी राष्ट्रवादीचे खानापूर तालुकाध्यक्ष अॅड. बाबासाहेब मुळीक यांना गुरुवारी पत्रकार परिषदेत लगावला. लोकांच्या पाठबळावर मी पंचायत समितीला सर्वाधिक मतांनी विजयी झालो आहे. त्यामुळे उपसभापती पदाची खुर्ची मला जनतेने दिली आहे, मी खुर्चीला चिकटून राहिलो नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचा सल्ला मला कोणी देऊ नये, असेही उपसभापती बाबर म्हणाले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अॅड. मुळीक यांनी बुधवारी पंचायत समितीत राष्ट्रवादीचीच सत्ता असल्याचे सांगून, उपसभापती बाबर हे राष्ट्रवादीचेच काम करीत आहेत, त्यामुळे पक्षाविरुध्द भूमिका घेण्यापूर्वी त्यांनी प्रथम राष्ट्रवादी कॉँग्रेसचा राजीनामा द्यावा, असा सल्ला दिला होता. त्यावर गुरुवारी उपसभापती बाबर म्हणाले की, ग्रामपंचायतीच्या निवडणुका पक्षीय पातळीवर लढविल्या जात नाहीत. त्यामुळे मी पक्षाचा उल्लेख केला नव्हता. परंतु, तालुक्यातील १३ पैकी १० ग्रामपंचायतीत आ. अनिल बाबर समर्थकांचे सरपंच व उपसरपंच आहेत. प्रसारमाध्यमांनीही ही वस्तुस्थिती समोर आणली होती. आम्ही गेल्या दहा वर्षांपासून सत्तेत नव्हतो. तरीही आम्हाला जनाधार मिळाला. लोकांनी आम्हाला डोक्यावर घेतले, ते गेल्या विधानसभा निवडणुकीत दिसून आले. त्यामुळे जनतेच्या दरबारात दिशाभूल करणारा युक्तिवाद चालत नाही. त्यासाठी जनतेची मने जिंकावी लागतात. अनेक निवडणुकांत ज्यांनी पक्षांशी विसंगत भूमिका घेऊन काम केले, त्यांच्या तोंडी पक्षनिष्ठा, पक्षशिस्त, पक्षादेश असे शब्द शोभत नाहीत. त्यामुळे आम्हाला कोणी पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोलाही बाबर यांनी लगावला. (वार्ताहर)सर्वांना विश्वासात घेतोखानापूर पंचायत समितीच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमात आम्ही सर्व सदस्यांना विश्वासात घेऊन काम करतो. सर्व कार्यक्रमांचे निमंत्रण जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना देत असतो. ते कार्यक्रमांना उपस्थित राहतात. त्यामुळे पंचायत समितीचा कारभार लोकाभिमुख व सर्वांना विश्वासात घेऊन केला जात असल्याचेही बाबर यांनी यावेळी सांगितले.
पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांनी पक्षनिष्ठा मला शिकवू नये
By admin | Updated: August 14, 2015 00:06 IST