‘त्या’ विद्यार्थ्यांच्या भविष्याला आर्थिक मदतीचे कोंदण!
By Admin | Updated: June 20, 2014 00:36 IST2014-06-20T00:35:16+5:302014-06-20T00:36:37+5:30
जिद्दीला साथ : सुरेश पाटील यांनी घेतली जबाबदारी

‘त्या’ विद्यार्थ्यांच्या भविष्याला आर्थिक मदतीचे कोंदण!
सांगली : सर्वोेदय हायस्कूलमधील वैभव हेगडे आणि स्रेहल कांबळे या दोन विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत उत्तुंग यश प्राप्त केले. ‘लोकमत’मध्ये याबाबतचे वृत्त प्रसिध्द झाल्यावर त्याची दखल खादी व ग्रामोद्योग मंडळाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी घेतली. या दोघा गुणवंत विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाचा सर्व खर्च करण्याचे आश्वासनही त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिले.
घरची आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही आत्मविश्वास आणि जिद्दीच्या बळावर सर्वाेदय हायस्कूलमधील बांधकाम मजुराचा मुलगा वैभव हेगडे आणि एका पेंटरची मुलगी स्नेहल कांबळे या दहावीतील विद्यार्थ्यांनी चांगले गुण संपादन केले. वैभवने वाढप्याचे काम करीत ८७ टक्के, तर स्रेहलने आईला घरकामात मदत करीत ७६ टक्क्यांपर्यंत मजल मारली. दहावी तर झाली, आता पुढे काय? असा प्रश्न वैभव आणि स्रेहल यांच्या पालकांसमोर होता. यशाचा अचूक वेध घेताना दोन्ही विद्यार्थ्यांनी प्रतिकूल परिस्थितीचे रडगाणे गात न बसता धैर्याने संकटाचा सामना केला. नेमकी हीच वस्तुस्थिती ‘लोकमत’ने वाचकांसमोर मांडली. त्यांच्या जिद्दीची कहाणी वाचल्यानंतर सुरेश पाटील यांनी तात्काळ ‘लोकमत’च्या कार्यालयास संपर्क साधून त्यांच्या पुढील शिक्षणाची जबाबदारी घेत असल्याचे जाहीर केले.
वैभवला मेकॅनिकल इंजिनिअरिंगला जायचे असून स्रेहलला वाणिज्य शाखेत प्रवेश घ्यायचा आहे. दोघांनाही शैक्षणिक विश्वाच्या विस्तीर्ण आकाशात उंच भरारी घ्यायची आहे. यासाठी त्यांना आता ‘आर्थिक’ मदतीचे पंख लाभले आहेत. दोघेही दहावीपेक्षा उत्तम यश संपादन करतील, असा विश्वास शाळेतील शिक्षकांसह, त्यांच्या आई-वडिलांना आहे. (प्रतिनिधी)