नियमबाह्य क्रमांकाची सांगलीत तीस वाहने जप्त
By Admin | Updated: July 25, 2014 23:36 IST2014-07-25T23:00:30+5:302014-07-25T23:36:10+5:30
शहरात धरपकड : वाहतूक पोलिसांची कारवाई

नियमबाह्य क्रमांकाची सांगलीत तीस वाहने जप्त
सांगली : वाहनांवर नियमबाह्य क्रमांक टाकणाऱ्या वाहनचालकांची वाहतूक पोलिसांनी आज (शुक्रवार) अचानक धरपकड सुरु केली. शहरात दिवभरात नियमबाह्य क्रमांकाची ३० वाहने जप्त करण्यात आली. यामध्ये डिझेलवरील सहा रिक्षांचा समावेश आहे. त्यांच्याकडून दहा हजाराचा दंड वसूल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांच्या पथकाने ही कारवाई केली.
वाहनाची नंबर प्लेट कशी असावी, यासाठी नियमावली आहे. मात्र या नियमाचे कुणीही पालन करताना दिसत नाही. अनेक वाहनांच्या नंबर प्लेटवरील क्रमांक स्पष्टपणे दिसत नाही. पुढील बाजूस क्रमांक लिहिलेला असतो, मात्र मागे प्लेटवर स्वत:चे नाव, अथवा आडनाव, किंवा राजकीय नेत्याचा फोटो लावलेला असतो. महाविद्यालयीन तरुणांच्या दुचाकीवर ग्रुपची नावे लिहिण्यात आलेली आहेत. एखाद्या दुचाकीने रस्त्यावर कुणाला ठोकरले, तर नागरिकांना त्या दुचाकीचा क्रमांकही टिपता येत नाही, असा क्रमांक असतो. यामुळे जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी अशा दुचाकींवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या वर्षभरापासून वाहतूक पोलिसांकडून सातत्याने ही कारवाई सुरु आहे.
सावंत यांनी महाविद्यालयातील ग्रुपची दादागिरी मोडीत काढली आहे. तरीही काही तरुण ग्रुपचे नावे लिहीत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. यासाठी सावंत यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार निरीक्षक गोर्ले यांच्या पथकाने शुक्रवारी सकाळपासून ग्रुपचे नाव असो अथवा नियमबाह्य क्रमांक लिहिलेली दुचाकी, या सर्वांविरुद्ध कारवाईचा बडगा उगारला. सायंकाळपर्यंत ३० वाहने जप्त करण्यात आली होती. दुचाकी सोडविण्यासाठी वाहनधारकांनी वाहतूक शाखेसमोर मोठी गर्दी केली होती. (प्रतिनिधी)
हारकुन टुम
जप्त करण्यात आलेल्या विविध नंबर प्लेटवर ‘सरपंच हरभा तालीम’, ‘धाकलं पाटील’, ‘राज’, ‘पवार’, ‘हारकुन टुम’, ‘हिरकणी’, ‘आबा’, ‘कसं काय’, असा उल्लेख आहे. याशिवाय राजकीय नेत्यांचे तसेच महापुरुषांचे फोटोही लावले आहेत.